अवकाळीच्या तडाख्याने बळीराजा कोलमडला! मुंडेंच्या आक्रमकतेपुढे सरकार नमले; बांधावर पंचनाम्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी,मुंबई: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. राज्यात काल झालेल्या वादळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी मुंडे यांनी केली. त्यांच्या या ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ने सभागृहाचे वातावरण तापले, ज्याची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने सर्व्हेक्षण आणि मदतीची घोषणा केली.
नुकसानीचा थरार आणि मुंडेंचा संताप
मराठवाड्यातील बीड, परभणी, धाराशिव, लातूरसह विदर्भ आणि कोकणात निसर्गाचा कोप झाला आहे. धनंजय मुंडे यांनी नुकसानीची दाहकता मांडताना सांगितले की, “शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली गहू, ज्वारी आणि हरभऱ्याची पिके आता जमिनीला टेकली आहेत. आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा गारपिटीने उद्ध्वस्त झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाईसह संपूर्ण मराठवाड्यात बळीराजा रडकुंडीला आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ चर्चा न करता थेट कृती करण्याची वेळ आली आहे.”
विरोधकांची वज्रमुठ अन् मंत्र्यांची ग्वाही
या मुद्द्यावर आमदार विजय वडेट्टीवार यांनीही स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तर आमदार अभिमन्यू पवार यांनीही शेतकरी प्रश्नावर जोर दिला. धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीमुळे सरकारला तातडीने उत्तर देणे भाग पडले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार, ज्या ज्या जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीचा तडाखा बसला आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांचे आदेश दिले जात आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी सरकार घेईल.”
प्रशासनावर मुंडेंचा वचक
विशेषतः बीड जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे मुंडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. महसूल यंत्रणेने कागदावर अहवाल न बनवता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतात जाऊन पंचनामे करावेत, असे मुंडे यांनी ठणकावून सांगितले. या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासकीय अधिकारी बांधावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मदतीची एक आशा पल्लवित झाली आहे.
आगामी काही दिवसांत हे पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष मदत कधी पोहोचणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
—
Deepak Kaitke




