टॉप स्टोरी राजकारण

समृद्धीवर सुविधांची वानवा अन् पुतळ्याची फक्त घोषणाच; उपसभापतींनी प्रशासनाला सुनावले खडे बोल, आता द्यावे लागणार व्हिडिओ पुरावे!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्धी महामार्गावरील प्रस्तावित पुतळा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आज प्रशासनाची मोठी कोंडी झाली. “केवळ फाईलींवर उत्तरं देऊ नका, तर महामार्गावर नेमकं काय सुरू आहे याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगच सभागृहात सादर करा,” अशा कडक शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला सुनावले. यामुळे समृद्धी महामार्गावरील ‘कागदोपत्री’ कामांचे पितळ उघडे पडण्याची चिन्हे आहेत.

आमदार हेमंत पाटील यांनी आक्रमकपणे विचारले की, बाळासाहेबांच्या पुतळ्याची घोषणा होऊन तीन वर्षे उलटली, तरी अजून एक वीटही का रचली गेली नाही? यावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ‘माहिती घेऊन सांगू’ असे मोघम उत्तर देताच उपसभापतींनी हस्तक्षेप केला. हा प्रश्न केवळ एका नेत्याचा किंवा पुतळ्याचा नसून तो जनतेच्या अस्मितेशी जोडलेला आहे, त्यामुळे आठ दिवसांत याचे सविस्तर उत्तर देण्याचे आदेश त्यांनी दिले.

पुतळ्याच्या विलंबासोबतच समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या ‘हालअपेष्टां’चा पाढाच सभागृहात वाचला गेला. प्रशासनाकडून २२ फूड जॉईंट्स (उपाहारगृहे) सुरू असल्याचा दावा केला जातोय, पण प्रत्यक्षात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. विशेषतः महिलांच्या स्वच्छतागृहांची झालेली दैना आणि गुगल मॅपवर दिसणाऱ्या चुकीच्या माहितीवरून उपसभापतींनी संताप व्यक्त केला.
“मी स्वतः रस्त्यावर उतरून ही परिस्थिती पाहिली आहे, त्यामुळे प्रशासनाचा खोटेपणा आता चालणार नाही,” असे ठणकावून सांगत डॉ. गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात महामार्गावरील सुविधांची खरी स्थिती दर्शवणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या ‘सुपरव्हिजन’ मधील त्रुटी आता चव्हाट्यावर येणार असल्याने अधिकारी वर्गात चांगलीच धावपळ उडाली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *