नाशिक । बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय.) नाशिक सेंटर आणि AAA एन्टरप्रायजेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “बिल्ड एक्स्पो २०२६” या भव्य प्रदर्शनाचे आयोजन २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हे प्रदर्शन श्रद्धा लॉन्स, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे होणार असल्याची माहिती मानद सचिव तसेच बिल्ड एक्स्पो–२०२६ चे निमंत्रक अविनाश बी. आव्हाड यांनी दिली. यावेळी बी.ए.आय. नाशिक सेंटरचे अध्यक्ष मनोज खांडेकर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, बांधकाम उद्योगाशी निगडित बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशातील सर्वात जुनी आणि अग्रगण्य संस्था असून तिची स्थापना १९४१ मध्ये झाली. आज देशभरातील सुमारे २०० शहरांत या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत आणि २०,००० हून अधिक सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत. पायाभूत सुविधा उभारणारा बांधकाम उद्योग देशाच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीतही या क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.
हे प्रदर्शन बांधकाम उद्योगाशी संबंधित उत्पादक, सेवा प्रदाते आणि त्यांचा वापर करणारे व्यावसायिक यांच्यासाठी खुले राहणार आहे. या निमित्ताने पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद आणि व्यवहाराची संधी उपलब्ध होईल. विकसक, अभियंते, वास्तुविशारद, उत्पादक, पुरवठादार आणि तंत्रज्ञान प्रदाते यांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच होत असून बांधकाम मशिनरी, अत्याधुनिक साहित्य, बांधकाम केमिकल्स, इको-फ्रेंडली व शाश्वत बांधकाम साहित्य तसेच विविध प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल्सची सविस्तर माहिती येथे उपलब्ध असेल. वेगाने वाढणाऱ्या बांधकाम उद्योगाला नवी दिशा देणारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे हे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आगामी नाशिक कुंभ तसेच नागरी आणि पायाभूत सुविधा विकासातील अपेक्षित वाढ लक्षात घेता दर्जेदार बांधकाम, जलद प्रकल्प अंमलबजावणी आणि सुधारित सुरक्षा मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिल्ड एक्स्पो २०२६ निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
बिल्ड एक्स्पो २०२६ चे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री , कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग हे उपस्थित रहाणार आहेत. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी बी.ए.आय.चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, जनरल कौन्सिल मेंबर राजेंद्र मुथा , अभय चोकसी, नाशिक सेंटरचे माजी अध्यक्ष विजय बाविस्कर, उपाध्यक्ष प्रशांत सोनजे, कोषाध्यक्ष विलास निफाडे, सहसचिव संदीप दरगोडे, महेंद्र पाटील , सुभाष भंडारी, राजेंद्र पानसरे तसेच सर्व सभासद विशेष परिश्रम घेत आहेत.




