नाशिकमध्ये ‘हायव्होल्टेज’ राडा! पालकमंत्र्यांच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव गायब; महिला कर्मचाऱ्याने मंत्र्यांना भर सभेत झापले
‘मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही’; वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा रणरागिणी अवतार, महाजनांनी मागितली माफी
नाशिक | विशेष प्रतिनिधी:नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने एका महिला वन कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांनाच अंगावर घेतले. “संविधानाशी संबंध नसलेल्यांची नावे घेता, मग बाबासाहेबांचा विसर का पडला?” असा जळजळीत सवाल करत या महिलेने भर मैदानात पालकमंत्र्यांची कोंडी केली.
मैदानात नेमका थरार काय घडला?
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सुरू असताना गिरीश महाजन यांनी आपले भाषण पूर्ण केले. मात्र, भाषणात संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने उपस्थित असलेल्या वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांचा संयम सुटला. त्यांनी थेट मंत्र्यांच्या दिशेने जात जाब विचारण्यास सुरुवात केली. “ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री आहात आणि आम्ही पोलीस आहोत, त्या बाबासाहेबांना संपवायला निघालात का?” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘सस्पेंड करा, माती उचलेन; पण अपमान सहन करणार नाही!’
पोलीस अधिकारी आणि सहकारी माधवी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या अधिकच आक्रमक झाल्या. “मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी वाळूच्या गाड्या उचलेन, माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतल्याने पोलीस दलाचीही तारांबळ उडाली. “जे लोक लोकशाहीला कारणीभूत नाहीत, त्यांची नावे वारंवार घेता, मग महामानवाचा विसर कसा पडतो?” या त्यांच्या प्रश्नाने उपस्थित असलेले नेते निरुत्तर झाले.
गिरीश महाजनांची नरमाई आणि दिलगिरी
वातावरण तापल्याचे पाहून मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने सारवासारव केली. “माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. अनावधानाने नाव राहून गेले असेल. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.
प्रजासत्ताक दिनीच संविधानाच्या शिल्पकाराचे नाव विसरल्याने पालकमंत्र्यांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत असून, एका महिला कर्मचाऱ्याने दाखवलेले हे धाडस आज चर्चेचा विषय ठरले आहे.




