टॉप स्टोरी मुंबई

‘मास्टर ब्लास्टर’च्या अंगणात लवकरच वाजणार सनई-चौघडे; अर्जुनच्या ‘क्लीन बोल्ड’ होण्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:क्रिकेट विश्वाचा देव मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच एका शाही विवाहसोहळ्याची लगबग पाहायला मिळणार आहे. सचिन यांचे चिरंजीव आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आता आयुष्याच्या खेळपट्टीवर नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या लग्नाची पहिली पत्रिका राज्याच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचली आहे. गुरुवारी सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या ‘हाय-प्रोफाईल’ लग्नाच्या चर्चांनी आता संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरला आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक या जोडीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी सचिन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री आणि तेंडुलकर दांपत्यामध्ये कौटुंबिक गप्पा रंगल्या. त्यानंतर, सचिन यांनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानाकडे वळवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीत केवळ लग्नाचे आमंत्रणच दिले गेले नाही, तर तासाभराच्या या चर्चेत राज्यातील क्रीडा धोरणांवरही खलबते झाली. शासनाकडून सुरू असलेल्या विविध विकासकामांबद्दल सचिन यांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले.
अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटच्या मैदानात आपली वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजीने छाप पाडत असतानाच, आता तो सानिया चंडोकसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नासाठी कोणकोणते जागतिक दिग्गज उपस्थित राहणार आणि हा सोहळा नेमका कुठे रंगणार, याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. ‘मास्टर ब्लास्टर’च्या घरातील ही लगीनघाई आगामी काळात सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वात चर्चेचा विषय ठरणार हे मात्र नक्की!

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *