मुंबई | विशेष प्रतिनिधी:सरकारी कामासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचे दिवस आता संपले आहेत. शिवजयंतीच्या सुवर्णमुहूर्तावर राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ जाहीर केले असून, महसूल विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या १५ सेवा आता अवघ्या एका दिवसात निकाली निघणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या क्रांतीकारी मोहिमेची घोषणा केली असून, पुढच्या तीन महिन्यांत ठराविक तारखांना राज्यभर विशेष शिबिरांचा धडाका उडणार आहे.
या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार, सात-बारा उताऱ्यांमधील दुरुस्ती, जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, आणि नॉन-क्रीमीलेअर यांसारखी कामे जागेवरच पूर्ण केली जातील. इतकेच नव्हे तर अकृषिक (NA) परवानगी, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी आणि पीएम किसान नोंदणी यांसारख्या किचकट प्रक्रियाही एका दिवसात मार्गी लावण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी पालकांना आता वणवण करण्याची गरज भासणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या सज्ज झाल्या आहेत.
असे असेल अभियानाचे नेमके वेळापत्रक:
राज्यातील प्रत्येक नागरिकाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, यासाठी सरकारने पुढीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम आखला आहे:
१८ फेब्रुवारी ते ५ मार्च: मंडल स्तरावर पूर्वतयारी आणि अर्जांची छाननी केली जाईल.
७ मार्च आणि १४ मार्च: मार्च महिन्यातील विशेष शिबिरांचे आयोजन.
१० एप्रिल आणि १७ एप्रिल: एप्रिल महिन्यात प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी शिबिरे.
८ मे आणि १५ मे: नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर विशेष मोहिमेचा समारोप.
महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती या अभियानाचे थेट मॉनिटरिंग करणार असून, प्रलंबित फाईल्सचा डोंगर उपसण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून खऱ्या अर्थाने ‘लोकाभिमुख’ प्रशासन पाहायला मिळणार आहे.




