ध्येयनिष्ठ पत्रकारितेला ६० वर्षे पूर्ण होणे हा चमत्कारच; पद्मभूषण देशपांडे यांनी ‘आहुति’चा गौरव
मुंबई प्रतिनिधी:आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या माध्यमविश्वात ध्येयवादावर ठाम राहिलेल्या पत्रकारितेचा गौरव करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा अंबरनाथमध्ये पार पडला. *‘साप्ताहिक आहुति’*च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी, “आज जवळपास लोप पावलेल्या ध्ययनिष्ठ पत्रकारितेला साठ वर्षे पूर्ण होणे हा खरोखरच एक चमत्कार आहे,” अशा शब्दांत ‘आहुति’ आणि त्रिवेदी परिवाराचा गौरव केला.
अंबरनाथ येथील वडवली विभागातील रोटरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘आहुति’ची स्थापना ध्येयवादातून झाली असून, त्या ध्येयवादामागील शुचिता संस्थापक दिवंगत वसंत त्रिवेदी यांच्या नंतरच्या पिढीनेही तितक्याच निष्ठेने जपली आहे, असे त्यांनी नमूद केले. दिवंगत वसंत त्रिवेदी यांच्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरी, समाजासाठी आयुष्य झोकून देण्याची वृत्ती आणि माध्यमाबाबतची निष्ठा हीच आज हिरक महोत्सव साजरा होण्यामागील खरी पुण्याई असल्याचे त्यांनी सांगितले. “योग्य वेळी अमृत महोत्सवही साजरा होईल आणि इथल्या उपस्थितांच्या शुभेच्छा शतक महोत्सवासाठीही कामी येतील,” अशा शब्दांत त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य करताना पद्मभूषण देशपांडे म्हणाले की, आजची पत्रकारिता भाषा, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेबाबत ‘अनास्थेच्या प्रदेशा’तून जात आहे. तंत्रज्ञानामुळे माहिती पुरवण्याचे काम जवळपास संपले असून, वृत्तपत्रांना टिकायचे असेल तर निव्वळ माहितीपलीकडे जाऊन विश्लेषण, संदर्भ आणि धागेदोरे द्यावे लागतील. त्यासाठी अधिक गंभीर पत्रकारितेची आणि व्यासंगी व्यक्तींची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संस्कृतीचा विजय – मनोज सानप
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे प्रभारी उपसंचालक व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी आपल्या भाषणात ‘आहुति’च्या कार्याची तुलना यज्ञातील आहुतीशी केली. “यज्ञात आहुति दिली जाते, तसेच ‘आहुति’ साप्ताहिकाने समाजातील अनिष्ट प्रथा आणि अज्ञानाची आहुति देत ज्ञानाचा प्रकाश पसरवला,” असे ते म्हणाले.
संपादक गिरीश त्रिवेदी हे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याचे सांगत त्यांनी, “साठ वर्षांचे झालेले हे बाळ आज मोठा वटवृक्ष बनले आहे,” असा भावनिक उल्लेख केला. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रोच्चार आणि भारतीय परंपरेनुसार साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती वरचढ ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती, शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी होते. त्यांनी ‘आहुति’च्या साठ वर्षांच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. आमदार किसन कथोरे यांनी सरपंचपदापासून ‘आहुति’शी असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. बदलापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले यांनीही ‘आहुति’ला शुभेच्छा दिल्या.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहून त्रिवेदी परिवाराचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेविका ॲड. अपर्णा भोईर, सौ. पल्लवी लकडे, सौ. सुजाता भोईर, निखिल चौधरी, ॲड. स्वप्नील बागुल, पत्रकार प्रशांत मोरे, चित्रकार अनिल डावरे, अजित सावंत, विशाल ठाकरे, सौ. रेखा गुरव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वरदा गोखले यांनी सादर केलेल्या साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने झाली. सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले. संपादक गिरीश त्रिवेदी यांनी प्रास्ताविक, तर कार्यकारी संपादक मनीषा त्रिवेदी यांनी आभारप्रदर्शन केले.
ध्येयवाद, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेवरील निष्ठेचा वारसा जपत ‘आहुति’ने साठ वर्षांचा टप्पा ओलांडला असून, हा सोहळा केवळ उत्सव नव्हे तर वाचक, वितरक आणि समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ऐतिहासिक क्षण ठरला.




