मुंबई

शेतीचा ‘रिमोट’ आता शेतकऱ्याच्या हाती; मुंबईत रंगणार जगातील पहिल्या कृषी-एआय क्रांतीचा महासंग्राम!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्रातील पारंपरिक शेती आता कात टाकणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) बळावर बळीराजा थेट जागतिक बाजारपेठेशी जोडला जाणार आहे. राज्याच्या ‘कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी ‘एआय फॉर ॲग्री २०२६’ या जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिषदेमुळे महाराष्ट्रातील शेतीला जागतिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून गुंतवणूकदारांसाठी मोठी दारे उघडली जाणार आहेत. शेतातील पिकांवर पडणारी कीड असो वा हवामानाचा अंदाज, आता सर्व काही ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाने हाताळले जाईल.
या महापरिषदेसाठी जागतिक बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि आशियाई विकास बँकेसारख्या दिग्गज संस्थांनी हातमिळवणी केली आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे शानदार उद्घाटन होणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे, आधार कार्डचे जनक नंदन निलेकणी आणि जागतिक स्तरावरील तंत्रज्ञ या परिषदेत शेतीतील ‘डिजीटल क्रांती’वर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ‘भिल’ आदिवासी भाषेतील प्रगत लँग्वेज मॉडेल आणि वनस्पतींचे रोग ओळखणाऱ्या अत्याधुनिक प्रणालींचे अनावरण करण्यात येईल, जे शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल.
दोन दिवसांच्या या भरगच्च कार्यक्रमात केवळ चर्चाच नाही, तर प्रत्यक्ष स्टार्टअप्स आणि जागतिक गुंतवणूकदारांमध्ये मोठे करार होणार आहेत. ‘महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज’ आणि ‘महाविस्तार व्हॉइस टेलिफोनी’ यांसारख्या प्रकल्पांमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यालाही आधुनिक माहिती घरबसल्या मिळणे शक्य होणार आहे. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘तिच्यासाठी सह-रचना’ यांसारख्या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र हे केवळ देशाचेच नव्हे, तर जगाचे ‘कृषी-तंत्रज्ञान केंद्र’ बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *