टॉप स्टोरी मनोरंजन मुंबई

राजबिंडा अभिनेता ‘अरुण सरनाईक’ यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर; ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

मुंबई, विशेष प्रतिनिधी:मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांचा गौरवशाली जीवनप्रवास ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ उपक्रमांतर्गत या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.

स्मृतींना उजाळा देणारा माहितीपट

१९६० आणि ७० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अरुण सरनाईक आजही ‘रंगल्या रात्री अशा’, ‘मुंबईचा जावई’ आणि ‘केला इशारा जाता जाता’ यांसारख्या अजरामर चित्रपटांमुळे स्मरणात आहेत. त्यांच्या कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. जुन्या आठवणी, दुर्मिळ दस्तऐवज आणि वैयक्तिक संवादांतून सरनाईक यांचा वारसा प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शकाची जोड

या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभ्यासक आणि दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांनी केले आहे. चार राज्य पुरस्कारांचे मानकरी असलेल्या अरुण सरनाईक यांची कारकीर्द आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांचा सुरेख संगम या माहितीपटात पाहायला मिळेल. सिनेप्रेमींनी या विशेष प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाचा तपशील:
तारीख: शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६
वेळ: दुपारी ३:०० वाजता
ठिकाण: लघु नाट्यगृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *