ठाणे, दि.३। प्रतिनिधी ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोकं ठेवून विचित्रपद्धतीने कवायत करून घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. पावसाच्या पाण्यात डोकं तसेच शरीरावरील सर्व कपडे ओले असून त्यातच मोठ्या दांड्याने त्यांना बेदम मारहाण होत असल्याचे व्हीडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही विद्यार्थी जिवाच्या आकांताने ओरडत आहेत. तरीही त्यांना मारहाण होत आहे. या प्रकारामुळे जोशी- बेडेकर महाविद्यालयातील नुकत्याच कालपासून सुरु झालेल्या ज्युनिअर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थांनी या महाविद्यालयात एनसीसी नको असे स्पष्ट सांगितले. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत. या प्रकारानंतर मनसे सैनिक तात्काळ महाविद्यालयाच्या परिसरात जमा झाले आणि याबाबत जाब विचारण्याकरीता प्राचार्यांना भेटण्यास गेले. मात्र प्राचार्य यावेळी उपलब्ध नव्हत्या. तसेच यावेळी झालेल्या घटनेबाबत प्राचार्य आणि सिनिअर पोलिस अधिक्षक यांच्यात संवाद झाला असल्याचे माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. या प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थ्यांला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच याबाबत पुन्हा येऊन महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.