मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मृत व्यक्तीचे नाव अनिल एकनाथ मालठाणे (वय ४५, रा. लक्ष्मीनगर) असे आहे. ते मलकापूर येथील महाबीज कार्यालयात कार्यरत होते. काम संपवून ते सायंकाळी घरी परतले होते. दरम्यान, कामासंदर्भात पुन्हा बोलावणे आल्याने त्यांनी आपली दुचाकी महामार्गाच्या उत्तर बाजूस उभी केली व पायी रस्ता ओलांडत असताना नागपूरकडून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, अनिल मालठाणे हे सुमारे १५ ते २० फूट अंतरावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




