मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
मलकापूर (प्रतिनिधी):मलकापूर तालुक्यातील रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबल्याने एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतकाचे नाव मल्हार विनोद फासे (वय २० वर्षे, रा. हिंगणकाझी, ता. मलकापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून गंभीर जखमी झालेल्या मल्हार फासे यांना त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची खबर उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथील डॉ. स्वाती पाटील यांच्या वतीने वॉर्ड बॉय राजू तुकाराम गोमटे (वय ५२ वर्षे) यांनी दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यू क्रमांक ०२/२०२६, कलम १९४ BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
ही घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजता घडली असून मृतकास दुपारी १.३६ वाजता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणाची नोंद पोहेकॉ तडवी (ब.नं. ९७८) यांनी केली आहे.
या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रविकांत बावस्कार (ब.नं. ६७१) करीत असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार प्रकरण तपासात घेण्यात आले आहे. घटनेचा नेमका कारणपरिस्थितीचा तपास सुरू आहे.




