मुंबई

आता ‘लालपरी’चा प्रवास होणार डिजिटल; सवलतींच्या सुविधेसाठी खिशात ‘हे’ कार्ड असणं झालं बंधनकारक!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता कात टाकली असून, प्रवाशांसाठी प्रवासाचा एक नवा ‘स्मार्ट’ मार्ग खुला झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या प्रवासात ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे केवळ सुट्या पैशांचा प्रश्न सुटणार नाही, तर विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी आता हे डिजिटल कार्ड असणे प्रवाशांसाठी अनिवार्य झाले आहे. ही प्रणाली पारदर्शकता वाढवण्यासोबतच प्रवासाला अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
एसटी महामंडळाने तंत्रज्ञानाच्या या नव्या पावलासाठी मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सर्व सवलतधारकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल, तर ज्येष्ठांना आणि महिलांना आधार कार्डच्या आधारे हे स्मार्ट कार्ड प्राप्त करता येईल. तसेच, दिव्यांग बांधवांना त्यांच्या विशेष क्रमांकाचा (UDID) वापर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. पत्रकार आणि पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या विभागीय कार्यालयामार्फत कार्डाचे वितरण केले जाईल.
हे स्मार्ट कार्ड प्रवाशांना १९९ रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे, परंतु ज्यांच्याकडे पूर्वीची स्मार्ट कार्डे आहेत, त्यांना केवळ १४९ रुपयांत हे नवीन कार्ड बदलून घेता येईल. प्रवाशांना बसमधील तिकीट मशीन, एसटीचे संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवरून सहजपणे हे कार्ड रिचार्ज करता येईल. ग्रामीण भागातील प्रवाशांना नोंदणीसाठी अडचण येऊ नये, म्हणून ३००० हून अधिक अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली असून बसस्थानकांवरच नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिकीटाची चिंता आणि सुट्या पैशांची कटकट आता इतिहासजमा होणार असून, एसटीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ होणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *