विशेष प्रतिनिधी:दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे जास्तीचे टाकण्यासाठी गोकुळ दूध महासंघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा थेट फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, हे नवे वाढीव दर आज शुक्रवार संध्याकाळपासूनच लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांचे घरगुती बजेट आता अधिकच कोलमडणार आहे.
गोकुळने म्हैस आणि गाय अशा दोन्ही दुधाच्या खरेदी दरात वाढ केली असून, म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ५२ रुपये ५० पैशांनी खरेदी होणारे दूध आता ५३ रुपये ५० पैशांनी खरेदी केले जाणार आहे. तसेच गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हा दर ३४ रुपयांवरून ३६ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न या निर्णयामागे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मात्र, शेतकऱ्यांना दिलेल्या या दिलासाचा भार ग्राहकांच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. खरेदी दरासोबतच विक्री दरातही वाढ करण्यात आली असून, म्हशीच्या दुधाचा विक्री दर २ रुपयांनी वधारला आहे. आता ग्राहकांना ६८ रुपयांऐवजी ७० रुपये प्रतिलिटर दराने दूध घ्यावे लागणार आहे. ऐन महागाईच्या काळात दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने मध्यमवर्गीयांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, या दरवाढीचा परिणाम आता बाजारातील इतर दुग्धजन्य पदार्थांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—
Deepak Kaitke




