मातीच्या कुशीतून उमललेलं स्वप्न; शेतकरी कुटुंबातील लेकीची वैद्यकीय क्षेत्रात गगनभरारी
मुंबई (प्रतिनिधी): काही यशकथा केवळ पदवी मिळवण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या माणसांच्या कष्टांना अर्थ देतात, संघर्षाला प्रतिष्ठा देतात आणि स्वप्नांना पंख देतात. डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचा वैद्यकीय प्रवास अशीच मनाला खोलवर स्पर्शून जाणारी कहाणी आहे. कष्ट आणि प्रचंड स्पर्धात्मक असलेल्या एम डी डर्मेटोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची झालेली निवड ही केवळ वैयक्तिक यशाची नव्हे, तर शेतकरी कुटुंबाच्या न बोलता जपलेल्या असंख्य स्वप्नांची पूर्तता आहे.
वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) हे डॉ. गौरी यांचे मूळ गाव. त्यांच्या या यशामुळे गावात आनंद, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण पसरले आहे.
मातीशी नातं जपणाऱ्या घरात जन्मलेली गौरी लहानपणापासूनच कष्ट, शिस्त आणि संयम या मूल्यांत वाढली. घरात लाभलेलं अभ्यासपूर्ण वातावरण, पुस्तकांशी जुळलेली मैत्री, वेळेचं काटेकोर नियोजन आणि साधी पण शिस्तबद्ध जीवनशैली, या सगळ्यांनी तिच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. अभ्यासासोबतच समाजाविषयीची जाणीव आणि माणुसकीची जबाबदारी तिच्या मनात हळूहळू रुजत गेली.
केवळ परीक्षा जिंकणारे नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे संवेदनशील डॉक्टर घडवण्याची शिकवण तिच्या संपूर्ण वाटचालीत ठळकपणे दिसून येते. आत्मविश्वास, सातत्य आणि मूल्याधिष्ठित जीवन यांचा खरा अर्थ तिने अनुभवातून समजून घेतला.
डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचे शालेय शिक्षण शारदानगर, बारामती येथे झाले. त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथून त्यांनी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले, तर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. हा प्रवास केवळ शैक्षणिक नव्हता, तर तो संयम, चिकाटी आणि स्वप्नांवरील अढळ निष्ठेचा होता.
या यशामागे अनुरथ झोळ आणि लक्ष्मी झोळ या दोन शांत पण मजबूत आधारस्तंभांचा मोठा वाटा आहे. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलींच्या स्वप्नांना पाणी घातले. प्रत्येक अपयशात आधार दिला, तर प्रत्येक यशात डोळ्यांत न उमटलेलं समाधान साठवून ठेवलं.
गौरी झोळ ही केवळ एक डॉक्टर नाही, तर ती आई-वडिलांच्या संघर्षाची साक्ष आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊनही मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस तिने केलं, कारण तिच्या पाठीशी कष्टकरी पालकांची न बोलता दिलेली, पण भक्कम साथ होती.
अनुरथ झोळ यांची दुसरी मुलगी मानसी झोळ हिने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती एम पी एस सी परीक्षेची तयारी करत आहे. शेतीतून उभ्या राहिलेल्या घरातून प्रशासनात पोहोचण्याचं स्वप्न पाहणारी मानसी ही नव्या पिढीच्या आशा, आकांक्षा आणि संघर्षाचं प्रतीक आहे.
आज डॉ. गौरी झोळ यांच्यावर शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्यांची ही वाटचाल असंख्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा दीप ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी कष्ट, त्याग, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणावरची श्रद्धा असेल, तर स्वप्नं नक्कीच प्रत्यक्षात उतरतात, हा मूक पण ठाम संदेश ही यशकथा देऊन जाते.
या यशप्रसंगी डॉ. गौरी अनुरथ झोळ म्हणाल्या,
“आज मी एम डी पदवीपर्यंत पोहोचले आहे, पण हे यश माझे एकटीचे नाही. हे माझ्या आई-वडिलांचे आहे. वडिलांनी माझ्या स्वप्नांना बळ दिलं, तर आईने घरात धीर धरून मला अभ्यासासाठी आधार दिला. त्यांच्या डोळ्यांत मी जे स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करणं हेच माझं खरं यश आहे.
आज डॉक्टर म्हणून समाजाप्रती माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. माझं शिक्षण केवळ माझ्यासाठी नाही, तर गरजू रुग्णांसाठी आहे. ग्रामीण भागातील, कष्टकरी कुटुंबातील प्रत्येक मुलीला मी एवढंच सांगू इच्छिते, परिस्थिती अडचणीची असली, तरी स्वप्न पाहणं थांबवू नका. मेहनत, श्रद्धा आणि संयम असतील, तर देवही वाट मोकळी करतो.” गौरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




