महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते शरद पवार काल पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेवर हजर होते. किंबहुना तेच वेळेवर आले. पंतप्रधानांसह सर्व मंत्री १० मिनिटांनंतर आले. राजकारणात जशी वेळ साधायला महत्त्व असते तसेच वेळेच्या बाबतीत काटेकोर राहण्यालाही महत्त्व असते. शरद पवार त्याबाबतीत अत्यंत काटेकोर असतात. काल संपूर्ण पुणे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी उभे होते. शरद पवार यांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचाही विरोध होता. पण पवारांनी हजर राहण्याचा शब्द दिला कारण टिळक कुटुंबियांकडून पवार यांनाच निमंत्रण देण्यात येण्याचे सांगितले होते. आपण ज्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना बोलावले त्या कार्यक्रमास आपणच अनुपस्थित राहून कसे चालेल? आणि पवार साहेब दिलेला शब्द पाळतात. ऐन वेळी कार्यक्रमाला जाणे टाळले असते तर त्यामुळे महाराष्ट्रात सुसंस्कृतपणा नाही असे दिसले असते. काही इतर राज्यांत विरोध म्हणजे वैर असे राजकारण आजही आहे.
महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे पक्के मित्र पण राजकीयदृष्ट्या त्यांचा ३६ चा आकडा. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील जे जे नेते होते ते तेव्हाच्या सत्ताधारी पक्षांबरोबर मधुर संबंध ठेवून होते. मग ते यशवंतराव चव्हाण असोत, वसंतराव नाईक असोत किंवा शरद पवार असोत. या सर्वांनी महाराष्ट्रात कितीही विरोध असला तरी व्यक्तिगत मैत्री केली होती. शरद पवार यांनी काल उपस्थित राहून आपला विरोध राजकीय आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले. त्यांनी आपल्या भाषणात मीडियाबाबत जी विधाने केली त्याचेही आगळे महत्त्व आहे. त्या कार्यक्रमात राजकारण न आणता त्यांना जे बोलायचे ते बोलून गेले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना त्यांची उपस्थिती खटकली. अजित पवार यांनी तर पक्ष फोडल्यावर आपल्या काकांसमोर लोटांगण घातले. ते काल समारंभाला नाईलाजाने हजर होते. पण त्यांची देहबोली वेगळीच भासत होती. अनेक काँग्रेसजनांनीही पवारांची उपस्थिती दर्शवू नये असा सल्ला दिला होता. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका कार्यक्रमास आपण तिघे म्हणजे काँग्रेस, उद्धवरावांची शिवसेना आणि आपली राष्ट्रवादी एकत्र राहिली तर आपला विजय निश्चित आहे, असे घोषित केले होते.
शरद पवार यांच्या पोटात काय आहे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही समजणार नाही. अजित पवार आणि त्यांचे ३८ समर्थक हे जाणून आहेत की आजही महाराष्ट्रात शरद पवार चमत्कार करू शकतात. आजपर्यंत शरदरावांनी कधीच भाजपशी दोस्ती केलेली नाही. त्यामुळे भाजपबरोबर जाण्याची दिवास्वप्ने पाहणारे उताणे पडलेले दिसतील. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तंबूच्या मध्यभागी शरद पवार आणि खांबावर आजूबाजूला काँग्रेस आणि शिवसेनेला उभी केली आहे. म्हणजेच या आघाडीच्या केंद्रस्थानी शरद पवार आहेत. खुद्द बारामतीतही अजित पवार यांना निवडून येण्यासाठी काकांचेच पाय धरावे लागतात की काय अशी परिस्थिती आहे. एकूण कालच्या पवारांच्या उपस्थितीबद्दल कितीही शंकाकुशंका व्यक्त केल्या तरी पवार इंडियाला धोका देणार नाहीत. बाकी ज्याला जे समजायचे आहे ते समजा. शरद पवार यांना समजणे तेवढे सोपे नाही, हाच कालच्या सभेचा निष्कर्ष आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील पवारांची पॉवर आगामी काळात दिसून येईल.