अंबरनाथ

अंबरनाथ नगरपालिकेत भाजपा आणि कॉंग्रेसची अभद्र युती झाली असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार:शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांची घोषणा

अंबरनाथ , दि . ७ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपालिकेत भाजप सोबत काँग्रेस पक्षाची अभद्र युती झाली असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची घोषणा शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे . शहरात होणाऱ्या विकासकामांना आम्ही सहकार्य करू मात्र जिथे – जिथे चुकीची कामे होतील त्याला आम्ही विरोध करणार असा ईशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

काल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पनवेलकर प्लाझा येथील संपर्क कार्यालयात शिवसेनेतर्फे तातडीची पत्रकार आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी ही घोषणा केली. ते पुढे म्हणाले की भाजप एकीकडे काँग्रेस मुक्त भारतचा संकल्प करतो तर दुसरीकडे काँग्रेससोबत सत्ता करतो हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. काँग्रेस हा हिंदुविरोधी पक्ष असून भाजपच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध त्यांची विचारसरणी आहे. मात्र स्वार्थी राजकारणामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत यांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक शिवसेना आणि भाजपचे निवडून आले आहेत. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले तरी ती मैत्रीपूर्ण लढत होती मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतानाच अशा प्रकारच्या अभद्र युती होणार असतील तर त्याचे गंभीर परिमाण भाजपला भोगावे लागेल असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे .

नुकत्याच झालेल्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकूण ५९ नगरसेवकांपैकी सर्वाधिक २७ नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्या खालोखाल भाजप १४, काँग्रेस १२, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) ४, तर २ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. मात्र थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या निवडून आल्या आहेत. भाजप ,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जवळपास निश्चित झाली असून त्याची घोषणा होणे फक्त बाकी आहे.
शिवसेना,भाजप यांच्या युतीसंदर्भात स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र ही युती फिस्कटल्याने शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान अंबरनाथ मध्ये भाजपा सोबत युती केल्या प्रकरणी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर कॉंग्रेस च्या वतीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *