अंबरनाथ

विद्यार्थी रमले शब्दांच्या गावात

अंबरनाथ , दि . २७ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपरिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड व नगराध्यक्ष मा. तेजश्री करंजुले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २७ फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा” या संकल्पनेवर आधारित सुप्रसिध्द वृत्त निवेदिका आणि सुसंवादक दीपाली केळकर यांच्या “शब्दांच्या गावा जावे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा गांधी विद्यालयातील ८ वी आणि ९ वीचे सुमारे ४५० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य विद्यार्थीनीनी सादर केले. दीपाली केळकर यांनी मुलांशी संवाद साधताना शब्दांची विविध रूपे, त्यांचे स्वभाव अशी वैशिष्ट्ये सांगत मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो हे सहज, सोप्या भाषेत सांगितले. ९ वीच्या पल्लवी डोंबाळे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचा अभिमान का वाटतो आणि आपण मराठी भाषा जपण्यासाठी काय केले पाहिजे हे अत्यंत सुंदररित्या मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून आयोजन करण्याचे प्रयोजन शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली जोशी यांनी केले. कार्यक्रमास महात्मा गांधी विद्यालयाचे उपमुख्याधापक राजेश रोहिदास आणि पर्यवेक्षक तुषार सोनजे तसेच इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव करणारे एक नवीन गीत विद्यालयाच्या संगीत शिक्षिका स्वरदा गोखले यांनी सादर केले. अंबरनाथ नगरपरिषदेचे नोडल अधिकारी श्री. स्वनिल जाधव आणि इतर अधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *