नवी दिल्ली, दि.०१। वृत्तसंस्था आमदार आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज हे दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची जागा घेतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचीही नावे एलजी अर्थात नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात रविवारी अटक करण्यात आलेले शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. यानंतर काही वेळातच त्यांचा राजीनामा आला. तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांनीही सिसोदिया यांच्यासोबत राजीनामा दिला. सिसोदिया यांना उइखने २६ फेब्रुवारी रोजी लिकर पॉलिसी प्रकरणात अटक केली होती, तर सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी ३० मेपासून तिहार तुरुंगात आहेत.
सिसोदिया हे केजरीवाल सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री होते. त्यांच्याकडे एकूण ३३ पैकी १८ पोर्टफोलिओ होते. त्याचबरोबर जैन यांच्याकडे आरोग्य, उद्योग यासह ७ मंत्रालयांची जबाबदारी होती. हे विभाग नंतर सिसोदिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्याचवेळी सिसोदिया यांचे राजीनाम्याचे पत्रही समोर आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले की, ८ वर्षे प्रामाणिकपणे आणि सत्याने काम करूनही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी आहे. मी निर्दोष आहे, हे मला आणि माझ्या देवाला माहीत आहे. हे आरोप काही नसून अरविंद केजरीवाल यांच्या सत्याच्या राजकारणाला घाबरलेल्या भ्याड आणि दुबळ्या लोकांचे कारस्थान आहे.