अंबरनाथ , दि . २ प्रतिनिधी : अंबरनाथ मधील शेतकी सोसायटीला १९६३ साली शेती करण्यासाठी २१० एकर जमीन शासनाने दिली होती . मात्र या सोसायटीने शेती लागवड न करता त्या शेतीचा दुरपयोग केला म्हणुन मुंबई उच्च न्यायालयाने सदर जमीन शासनाच्या ताब्यात दिल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता त्या जमीनीवर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
अंबरनाथ पश्चिम येथील जांबुळ पाडा येथे २१० एकर शेती ही शेतकी सोसायटीला लागवड करण्यासाठी शासनाने मोफत दिली होती . मात्र या सोसायटीने त्या जमीनीचा गैरवापर केला . तेव्हा शासनाने जमीन ताब्यात मिळावी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती . त्यांच जमीनीवर एका इमारती मध्ये शासनाने वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले असुन या महाविद्यालयात १०० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत . तर त्याच ठिकाणी ४३० बेडचे रुग्णालय तयार करण्याचा प्रस्ताव देखील मंजुर झाला आहे . या साठी आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी प्रयत्न केले आहेत . दरम्यान ज्या जमीनीवर वैद्यकीय महाविद्यालय सुरु आहे, ती जमीन शेतकी सोसायटीच्या ताब्यात आहे . आता त्या जमीनीचा निकाल लागला असुन संपुर्ण जमीन शेतकी सोसायटीने शासनाच्या ताब्यात देण्यात यावी असा निकाल दिल्याने आता महाविद्यालय व रुग्णालय यांचा मार्ग मोकळा झाला आहे . दरम्यान तीन महिन्याच्या आत सोसायटीने ती जमीन शासनाच्या ताब्यात द्यावी असा निर्णय असल्यामुळे सदर जमीनीचा ताबा लवकरच घेवु असे अंबरनाथ चे तहसिलदार अमित पुरी यांनी सांगितले आहे. दरम्यान आता या जमीनीवर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




