अंबरनाथमधील ३२ वार करून झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास आता ‘एसआयटी’कडे ; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती
अंबरनाथ , दि . २१ प्रतिनिधी : येथील संजय पाटील यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला आता दीड वर्षांनंतर महत्त्वाचे वळण मिळाले असून, उच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १० च्या सुमारास संजय पाटील यांच्यावर ३२ वार करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी स्थानिक शिवाजीनगर पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आणि ठोस पुरावे असूनही आरोपींना अटक न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मृताची पत्नी विद्या पाटील यांनी केला होता. स्थानिक पोलिसांच्या या भूमिकेमुळे अखेर मृताचा मुलगा हार्दिक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायाची मागणी केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने स्थानिक पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर तीव्र ताशेरे ओढले आहेत. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आता पोलीस उपआयुक्त दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, हे काम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त पराग मणेरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने या तपासासाठी १२ आठवड्यांची कठोर मुदत आखून दिली असून, या कालावधीत संपूर्ण तपास पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.
विद्या पाटील यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे ही दाद मागितली होती, ज्यामध्ये त्यांनी आरोपींच्या कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याचे नमूद करत हा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती केली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या थेट हस्तक्षेपानंतर हा तपास वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्याने स्थानिक शिवाजीनगर पोलिसांनी यापूर्वीचे अर्ज दफ्तरी दाखल केले आहेत. दीड वर्ष उलटूनही आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंब दहशतीत होते, मात्र आता एसआयटीमार्फत होणाऱ्या या फेरतपासामुळे खऱ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ३२ वार करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्ह्यातील सूत्रधार आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार का, याकडे अंबरनाथवासीयांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात पोलिस परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना विचारले असता ते म्हणाले की संजय पाटील खून प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. या संदर्भात संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर विशेष पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. .




