टॉप स्टोरी नागपूर विदर्भ

संदीप जोशी यांची अंतर्मनाला साद; राजकारणातून निवृत्तीची घोषणा

राजकारण हे माझ्यासाठी पद व प्रतिष्ठेपेक्षा समाजसेवेचे माध्यम राहिले आहे. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करीत आहे. मर्यादित जागा, वाढलेल्या अपेक्षा यामुळे नवोदितांना संधी मिळत नाही. कुठेतरी थांबण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा आपणच थांबले पाहिजे असे माझे अंतर्मन म्हणाले आणि मी अंतर्मनाला न्याय देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय भाजपाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार, माजी महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर सह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

येत्या 13 मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये संदीप जोशी म्हणतात की मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणे आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणे हे आवश्यक वाटले. त्यामुळे मी राजकीय वाटचालीला पूर्णविराम देत आहे. यावेळी पक्षाविषयी ते कृतज्ञता व्यक्त करतात की पक्षाने मला मोठे केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर विविध संघटनांना मार्फत माझे समाजसेवेचे कार्य सुरूच राहील असे ते या पत्रात म्हणतात.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश
संदीप जोशी यांच्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त आक्रोश आणि बेचैनी दिसत आहे. जोशी यांच्या निवृतीच्या निर्णयानंतर त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. घोषणाबाजी करीत निर्णय मागे घेण्याची ते मागणी करीत आहेत. जोशी यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता कोणीही मागे येण्यास तयार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना आणि दबाव बघत संदीप जोशी यांनी आपला निर्णय 25 जानेवारीपर्यंत स्थगित केला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *