बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार; ताकदवर शिवसेना उपशहर प्रमुख शेकडो समर्थकांसह भाजपच्या गोटात;मात्र तिन्ही नगरसेविका शिवसेनेत ठाम
बदलापूर, दि.१९,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत कलह उफाळला आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली, यामध्ये शिवसेनेकडून दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली,त्यामध्ये हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले असल्याने बदलापूर शिवसेनेतील राऊत कुटुंबीय नाराज झाले.
या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेत शिवसेनेचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.कारण शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलेले हेमंत चतुरे काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेले असताना पक्षासाठी त्यांचं काम काय आहे ? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात होता. एकंदरीत शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करताना राऊत कुटुंबीयांना विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दि.१८ जाने.रोजी रविवारी शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख प्रविण राऊत यांनी शेकडो समर्थकांसह आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर विविध राजकीय चर्चेला उधाण आले होते. प्रवीण राऊत यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर तीन नगरसेवक शिवसेना शिंदे गटातून जाण्याची चर्चा शहरात रंगू लागली होती.कारण राऊत यांच्या पत्नी आणि वहिनी तसेच गणेश लामतुरे यांच्या पत्नी सौ.लामतुरे हे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक आहेत.मात्र याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शितल राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केले आहे.
२००८ ते आतापर्यंत निष्ठापूर्वक शिवसेना पक्षाचे काम करत आलेली आहे. प्रत्येकाला मताचा अधिकार आणि आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय प्रवीण राऊत यांचा व्यक्तिगत निर्णय होता यांवर माध्यमांशी बोलताना बदलापूर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शितल राऊत म्हणाल्या की, एकाच घरातील दोन पक्षात काम करणारे बदलापूर शहरात अनेक लोकं आहेत; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप पक्षाचे काम करतात तर शहरप्रमुख वामन म्हात्रे शिवसेनेचे काम करतात, शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर पाटील शिवसेनेत आहेत तर त्यांची बहीण रिद्धीता घोरपडे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्या.त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली त्यांना शिवसेनेचे विचार पटले नाही त्यांनी भाजपची साथ धरली त्या भाजपच्या नगरसेविका झाल्या.त्याचप्रमाणे भारत पाटील शिवसेनेत काम करतात तर त्यांचे भाऊ शिवसेना उद्धव पक्षाचे काम करतात.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की यामध्ये नवल नसल्याचे सांगितले. बदलापूर मधील राऊत कुटुंब पहिले असे कुटुंब नाही की, त्यांच्या एका घरात दोन पक्षात काम करणारे लोकं झाली. प्रविण राऊत यांचा वैयक्तिक सर्वस्वी निर्णय आहे. त्यांचा माझ्यावर कोणत्या पक्षात काम करावं हे बंधन नाही.मी शिवसेनेची नगरसेविका आहे शेवटपर्यंत शिवसेनेचे काम करत राहणार आहे. अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
यावेळी नगरसेविका दिपाली लामतुरे यांनी मी शिवसेनेची नगरसेविका पक्षाशी एकनिष्ठ आहे.पक्षातच कार्यरत असून शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगितले आहे.



