मुंबई, दि.६। प्रतिनिधी मुंबई मागील पाच दिवसांपासून बेस्टचा संप सुरू आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप पाचव्याही दिवशी सुरूच आहे. परंतु राज्य सरकारची भूमिका काय? यावर तोगडा काय? याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. पगारवाढ आणि बेस्टच्या विविध सुविधा ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. हे सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी वाहनांतून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून यामध्ये सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी आणि स्कूल बसेस यांमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आली आहे.