महाराष्ट्रातील नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपची निवडणूक रणनिती ठरवली
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी औपचारिकरित्या सूत्रे हाती घेतताच नितीन नबीन यांनी पक्षाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे निर्णय घेतले आहेत. आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापौर पदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने थेट ‘निवडणूक मोड’मध्ये प्रवेश केला असून, या प्रक्रियेतील केंद्रस्थानी महाराष्ट्रातील नेतृत्वाला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत राजकारणासह देशपातळीवरील सत्तासमीकरणांवरही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि राज्य मंत्रिमंडळात विविध महत्त्वाची खाती सांभाळलेले Nitin Nabin यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी संघटनात्मक फेररचना करत स्पष्ट संदेश दिला—पक्ष आता केवळ सत्तेच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित राहणार नाही, तर प्रत्येक निवडणूक ही रणनीतीपूर्वक आणि आक्रमकपणे लढवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय नेते Vinod Tawde यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण भारतात भाजपसाठी अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये अनुभवी आणि संघटनात्मक पकड असलेले नेतृत्व पाठवण्याचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांना सहप्रभारी म्हणून शोभा करंदलाजे यांची साथ देण्यात आली असून, राज्यातील संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
याचवेळी चंदीगड महापौर पदाच्या चुरशीच्या निवडणुकीची जबाबदारीही विनोद तावडे यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. स्थानिक सत्ताकारणात थोड्याशा फरकानेही निकाल बदलू शकतो, हे लक्षात घेता राष्ट्रीय नेतृत्वाने या निवडणुकीसाठीही अनुभवी चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे.
महाराष्ट्रातील दुसरे प्रभावी नेते आणि मुंबई भाजपमधील महत्त्वाचा चेहरा असलेले Ashish Shelar यांच्यावर तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत संघटनात्मक कामकाजाचा अनुभव असलेल्या शेलार यांना ही जबाबदारी देऊन भाजपने महाराष्ट्रातील नेतृत्वावरचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे. तेलंगणामध्ये भाजपसाठी स्थानिक पातळीवर मजबूत पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राम माधव, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर संयुक्तपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशातील महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आणि प्रभाव वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास
23 मे 1980 रोजी जन्मलेले नितीन नबीन हे झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे आमदार होते. 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन सक्रिय राजकारणात उतरले आणि त्याच वर्षी पोटनिवडणुकीतून प्रथमच बिहार विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि 2025 अशा सलग चार वेळा ते बांकीपूरचे आमदार राहिले आहेत.
रस्ते वाहतूक, नगरविकास, गृहनिर्माण, विधी व न्याय यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळतानाच त्यांनी संघटनात्मक पातळीवरही काम केले आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी आणि छत्तीसगडचे सहप्रभारी अशी जबाबदारी पार पाडल्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. 20 जानेवारी 2026 रोजी त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतताच घेतलेल्या या निर्णयांमधून नितीन नबीन यांची नेतृत्वशैली स्पष्ट होत आहे. अनुभवी नेत्यांवर जबाबदारी सोपवत, राज्यांच्या सीमा ओलांडून संघटन मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न भाजपला आगामी निवडणुकांमध्ये किती यश मिळवून देतो, याकडे आता देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




