टॉप स्टोरी नाशिक महाराष्ट्र

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर

डॉ. अनिरुद्ध पंडित, आशिष माने, चंद्रमोहन कुलकणी, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, उस्मान खान यांचा होणार सन्मान

नाशिक । मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ यंदाही जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी नाशिक येथे हा सन्मान सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी विज्ञान, साहस, चित्रकला, लोकसेवा, नाट्य आणि संगीत या विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान), आशिष माने (साहस), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), अभिनेते प्रशांत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) यांना यंदाचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा जपणारा पुरस्कार

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा जपणाऱ्या कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, हेच या पुरस्कारामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.” दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार आज केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक मानाचा सन्मान म्हणून ओळखला जातो.

पुरस्कार सोहळ्याची माहिती

हा पुरस्कार सोहळा रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे मंगळवार, दि. १० मार्च २०२६ सायंकाळी आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

प्रत्येक पुरस्कार्थीस रूपये २१,००० रोख रक्कम,
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तात्यासाहेब शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.
पत्रकार परिषदेस मान्यवरांची उपस्थिती
या पुरस्कार घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेला ॲड. अजय निकम, ॲड. राजेंद्र डोखळे, डॉ. दिलीप धोंगडे (सल्लागार), लोकेश शेवडे, ॲड. विलास लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *