टॉप स्टोरी राजकारण

“माझी जीभ कापली तरी मी थांबणार नाही”; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सत्ताधाऱ्यांनाच का ललकारले?

विशेष प्रतिनिधी:राज्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या एका वादग्रस्त आणि खळबळजनक ट्विटमुळे सत्ताधारी भाजपला थेट अंगावर घेतले आहे. टीपू सुल्तान प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून होत असलेल्या टीकेला आणि विरोधाला उत्तर देताना सपकाळ यांनी “माझी जीभ खुशाल कापा” असे म्हणत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता राजकीय संघर्षाची ठिणगी आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “माझी जीभ कापल्याने जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकन आयातीपासून संरक्षण होणार असेल, अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला योग्य भाव मिळणार असेल, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल आणि देशाने चीनकडून गमावलेला भूभाग परत मिळणार असेल, तर माझी जीभ नक्की कापा,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. भाजप केवळ हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालत असून मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सपकाळ यांनी पुढे असेही नमूद केले की, अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे हित जोपासणाऱ्या आणि संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपच्या धोरणांना आपण उघड करत आहोत, म्हणूनच त्यांना आपली भीती वाटत आहे. “मी भाजपला एक्सपोज करतो म्हणून त्यांना माझी जीभ कापायची असेल, तर त्यांनी ती खुशाल कापावी, पण मी माझा आवाज दाबून घेणार नाही आणि सत्य सांगणे थांबवणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी आता आक्रमक स्वरूप धारण केले असून, येणाऱ्या काळात सत्ताधारी आणि काँग्रेसमधील हा कलगीतुरा अधिकच धारदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *