भिवंडीत भाजपला अंतर्गत बंडाळीचा मोठा तडाखा; काँग्रेसचा ‘मास्टरस्ट्रोक’ यशस्वी, सत्तापालट निश्चित!
मुंबई | विशेष प्रतिनिधी,भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणाने आता एक अत्यंत नाट्यमय वळण घेतले असून, शहराच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या अंतर्गत नाराजीचा आणि उमेदवारीवरून झालेल्या वादाचा थेट फायदा उठवत काँग्रेसने भिवंडीत आपला ‘गेम प्लॅन’ यशस्वी केला आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी पक्षाचा आणि विचारधारेचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीला साथ दिल्याने आता भिवंडीचा महापौर ‘सेक्युलर फ्रंट’चाच होईल, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. या राजकीय भूकंपामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तेच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
भिवंडीत काँग्रेसने स्वबळावर ३० जागा जिंकल्या होत्या, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचे पाठबळ आधीच मिळाले होते. बहुमतासाठी अवघ्या ४ मतांची गरज असतानाच, भाजपचे नाराज नेते नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपला रामराम ठोकून ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजप उमेदवार स्नेहल पाटील यांच्या नावावरून नाराज झालेल्या चौधरी यांनी आपल्या मूळ घराकडे म्हणजेच काँग्रेसप्रणित आघाडीकडे वळण्याचा घेतलेला निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुरुवातीला समाजवादी पक्षाने शिंदे गटासोबत जाण्याचे संकेत दिल्याने आघाडीसमोर काही प्रमाणात पेच निर्माण झाला होता, मात्र भाजपमधील या मोठ्या फुटीने आता काँग्रेसचा मार्ग सुकर केला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबईत टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन सत्तास्थापनेच्या अंतिम रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. सपकाळ यांनी स्पष्ट केले की, येत्या काही दिवसांत भिवंडीत विशेष निरीक्षक पाठवून महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. भिवंडीतील या नव्या राजकीय समीकरणांमुळे महायुतीच्या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.




