टॉप स्टोरी महाराष्ट्र

कणखर, शिस्तबद्ध, आणि एक कार्यतत्पर नेतृत्व महाराष्ट्राने गमावले: भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. २८, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची घटना अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

प्रशासनावर जबरदस्त पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. यासोबतच सिंचन, ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली अमिट छाप सोडली असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.

अजितदादांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो. या दुःखद प्रसंगात संपूर्ण भाजपा परिवार पवार कुटुंबीय, त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या पाठीशी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *