१,१५० कोटींचा ‘तो’ कागद आणि जन्माआधीचा व्यवहार; शिंदेंच्या खासदाराभोवती भ्रष्टाचाराचा विळखा?
विशेष प्रतिनिधी:छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील जमिनीच्या मोबदल्यावरून राज्याच्या राजकारणात एक अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर १,१५० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणातील ‘ट्विस्ट’ने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा बॉम्ब टाकला असून, जटवाडा येथील २३ एकर ३० गुंठे जमिनीच्या व्यवहारात मोठा गोलमाल झाल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख आणि त्याच्या नावे असलेला एक संशयास्पद ‘हिबानामा’.
जन्माच्या १४ वर्षे आधीच झाला व्यवहार?
दानवे यांनी मांडलेल्या पुराव्यानुसार, ही मौल्यवान जमीन १९७१ सालच्या एका हिबानाम्याद्वारे ड्रायव्हरच्या नावावर दाखवण्यात आली आहे. मात्र, धक्कादायक बाब अशी की, ज्याच्या नावावर हा व्यवहार झाला त्या जावेदचा जन्मच मुळात १९८५ सालचा आहे. “ज्या व्यक्तीचा जन्मच १९८५ मध्ये झाला, त्याच्या नावावर १९७१ मध्ये जमीन कशी काय वर्ग होऊ शकते?” असा टोकदार सवाल करत दानवे यांनी या तांत्रिक विसंगतीवर बोट ठेवले आहे.
सीआयडी चौकशीचे सावट
समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या या जमिनीचे मूल्य सुमारे १,१५० कोटी रुपये निश्चित झाले आहे. इतकी मोठी रक्कम लाटण्यासाठीच कागदपत्रांची फेरफार करून हा बनाव रचल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थेट सीआयडी (CID) चौकशीची मागणी केली आहे.
भुमरेंचे प्रत्युत्तर
दुसरीकडे, खासदार संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “जावेद शेख माझा ड्रायव्हर असला तरी त्याचा आणि या जमिनीचा काहीही संबंध नाही. विरोधकांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावेत,” असे आव्हान त्यांनी दिले आहे.
एका बाजूला भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला ‘बर्थ सर्टिफिकेट’ विरुद्ध ‘हिबानामा’ असा हा कायदेशीर पेच आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
—
Deepak Kaitke




