उमेदवारी न मिळाल्याने आत्महत्येचा संदेश देऊन शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता बेपत्ता
नाशिक । मी स्वत: शिवा तेलंग व माजी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी पण शिवसेना पक्षात २०२२ मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केली. लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभे राहिलो. पक्षाचे नाव चर्चेत ठेवलं. पक्षाच्या नावाने अनेक मोठे मोठे कार्यक्रम केले. पक्षाने काही जबाबदाऱ्या दिल्या, त्याही आम्ही पार पाडल्या. पण माजी नगरसेवक सुदाम ढेमसेंनी आमचा फक्त वापरच केला आहे. पक्षाच्या प्रवेशाच्या दिवशी यांना मोठ्या निधीच्या कमिटमेंट करून त्यांनी पक्षात प्रवेश केला. या घडामेडीत माझा विश्वासघात झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असा संदेश देऊन शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते शिवा तेलंग बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवसेना पक्षाच्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये इच्छुक असलेल्या त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते गायब झाले त्यांना शोधण्याचे सर्व प्रयत्न सुरू असून सायंकाळपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नव्हता. समाज माध्यमात पाठवलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, अकरा कोटी रुपयांचा निधी विभागात आला. पण त्या निधीचे फक्त भूमिपूजन झाले. काम कुठे पण झालं नाही. आलेला निधी गेला कुठं याची पण चौकशी झाली पाहिजे. माझ्याबरोबर राहून माझ्या पाठीत खंजीर खूपसून आत्तापर्यंत शिवसेनेचे संपर्क कार्यालय सुद्धा प्रभागांमध्ये नाही. अमोल जाधव यांनी पण निधी आणला, पण प्रभागामध्ये कुठेही कामे झाले नाही. फक्त चेतनानगर मध्ये हॉल बांधला. त्यांचापण एवढा मोठा निधी गेला कुठे याची पण चौकशी झाली पाहिजे. २९ तारखेला रात्री कॅनडा कॉर्नर येथे पक्षाचे एबी फॉर्म वाटप सुरू होते.
मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण चालू होती. पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील काही नेते त्यामध्ये सामील होते. त्या नेत्यांची नावे हेमंतआप्पा गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजूअण्णा लवटे, प्रवीण तिदमे यांनी मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण करून एबी फॉर्मचे वाटप आमच्यासमोर केले. आम्ही तिथे असताना अमोल जाधव यांना हेमंत गोडसे यांच्या पीएने मध्ये बोलून पैशाची मागणी केली. त्यानंतर अमोल जाधव हे आमच्या सोबत बाहेर येऊन चहा प्यायच्या वेळेस त्यांचा सहकारी अजय पाटील यांच्याशी साईटला जाऊन चर्चा करत होते. त्यानंतर आम्ही त्रंबक नाका पेट्रोल पंप या ठिकाणी थांबलो. तिथून अजय पाटील हे निघून गेले. असं सांगण्यात आलं की मला बाहेर जायचं आहे. पण त्यावेळी पैसे देऊन एबी फॉर्म अजय पाटील यांनी घेतला.
अमोल जाधव यांनी असं ठरवलं होतं की, एबी फॉर्म घ्यायचे असेल तर तिघांचे सोबत द्या नाहीतर देऊ नका. असे सांगूनही अमोल जाधव यांनी स्वतःचा फॉर्म घेतला आणि माझा एबी फॉर्म घेतला नाही. एक तारखेला मी व माझी पत्नी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांना समजून सांगितला. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतले आणि लगेच दादा भुसे, हेमंत गोडसे, विजय करंजकर, विलास शिंदे यांना फोन करून सांगितले. धामणे यांना माघार घ्यायला लावा आणि तेलंग यांना पुरस्कृत करा. एक तारखेला रात्री हेमंत गोडसे, विजय करंजकर यांनी अमोल जाधव सुदाम ढेमसे यांना फोन करून सांगितले की, शिवा तेलंग पुरस्कृत म्हणून जाहीर करायचे आहे. त्यानंतर दोन तारखेला सकाळी अमोल जाधव यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितले मला फोन आला होता. पण पुढे काहीच झाले नाही.
लिखाणातील विसंगतीमुळे पोलीस संभ्रमात
तेलंग यांनी म्हटले आहे की, माझी पत्नी ऑफिसवर गेली होती. तिथे अनिल गायकवाड, ज्योती गायकवाड यांनी असे म्हटले की त्यांना पुरस्कृत करीत आहे, तर मग आम्हाला पण करा. त्यानंतर सुदाम ढेमसे यांच्या ऑफिसला विजय करंजकर हे स्वतः येऊन तिथे सांगितले की, शिवा तेलंग यांना पुरस्कृत करायचे आहे. घामणे यांना माघार घ्यायला लावा असे आदेश सुदाम ढेमसे यांना दिले. त्यांनी त्या आदेशाचा पालन नाही केलं. त्यामुळे धामणे यांनी माघार घेतली नाही.
सुदाम ढेमसे यांचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्यामुळे आज माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागली. मी केलेली एवढ्या वर्षाची समाजसेवा व पक्षाचे नाव मोठे केले असल्यामुळे आज माझा पूर्णपणे विश्वासघात झाला. सर्व विषय मी तुम्हाला सर्वांना सांगतो आहे. माझ्या आत्महत्याला कोण जबाबदार राहतील ती नावे देत आहे. सर्वांनी नोंद घ्यावी आणि मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे माझ्या पत्नीला व मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यात यावा ही आपणास सर्व नागरिकांना विनंती आहे. माझ्या आत्महत्याला कारणीभूत असणाऱ्यांची नावात एक नंबर आरोपी सुदाम ढेमसे राहणार आहे.




