रामदास कदमांच्या टीकेला ‘डान्सबार’ने उत्तर देणार? अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीची सूत्रे सोपवण्याच्या हालचालींना वेग!
विशेष प्रतिनिधी:महायुतीमधील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला असून, शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा घेतला आहे. ठाण्याचे राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कदमांना थेट इशारा दिला की, जर त्यांनी आपली अभद्र भाषा थांबवली नाही, तर त्यांच्या कुटुंबाचे ‘डान्सबार’ आणि अनिल परबांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यांची लक्तरे वेशीवर टांगली जातील. “आम्ही आतापर्यंत युतीधर्म पाळला, पण आमच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशा शब्दांत परांजपे यांनी कदमांना ठणकावले आहे.
अजितदादांच्या अकाली जाण्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाचा हुकुमी एक्का पुढे करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आग्रहाखातर सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, असा ठराव ठाण्यातून मांडण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यासाठी विनंती केली जाणार असल्याचे संकेत परांजपे यांनी दिले. दादांच्या अपघाताची सीआयडी चौकशी सुरू असतानाच, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासारख्या नेत्यांनी संभ्रम निर्माण करणारी विधाने टाळावीत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
ठाणे महानगरपालिकेतील आगामी वाटचालीवर भाष्य करताना परांजपे यांनी सांगितले की, जनतेने दिलेल्या कौलानुसार कोकण भवन येथे स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला असून, नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढील पावले टाकेल. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून बोलणाऱ्या संजय राऊतांना त्यांनी ‘सबुरीचा’ सल्ला दिला असून, राष्ट्रवादी एनडीएमध्ये भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट केले आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत, ज्यांना जास्त घाई झाली आहे त्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले आहे.
—
Deepak Kaitke




