टॉप स्टोरी राजकारण

देशात पुन्हा ‘गोधरा’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

​विशेष प्रतिनिधी | मुंबई:​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “देशात सध्या ज्या प्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे विधान आंबेडकरांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

​’मीडियाकडून ध्रुवीकरणाचा प्रयत्न’
​प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करणाऱ्या माध्यमांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “मुस्लिम समाज आता काँग्रेसची साथ सोडून एमआयएमकडे (AIMIM) वळला आहे. मात्र, माध्यमांकडून या निकालांचे चुकीचे चित्र रंगवले जात आहे. प्रत्यक्षात मुस्लिम प्रतिनिधींच्या जागा कमी झाल्या असतानाही, सत्तेची सूत्रे मुस्लिमांच्या हाती जात असल्याचा भास निर्माण केला जात आहे. हे ‘हिंदू विरुद्ध मुस्लिम’ असे ध्रुवीकरण करून जनतेला भडकवण्याचे कारस्थान असून, यातूनच गोधरासारख्या घटनांना खतपाणी घातले जात आहे.”

​मुख्यमंत्र्यांनी ‘आरएसएस’ने लिहिलेला इतिहास वाचावा
​इतिहासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही मुख्य लढा ब्रिटिशांविरोधात होता. टिपू सुलतानचा पराभव करण्यासाठी पेशव्यांनी कोणाला साथ दिली, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे. “किमान आरएसएसच्या (RSS) कार्यकर्त्यांनी लिहिलेला इतिहास तरी मुख्यमंत्र्यांनी वाचावा, म्हणजे ते इतिहासाबाबत चुकीची विधाने करणार नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला.

​अग्निवीरांच्या सन्मानासाठी न्यायालयीन लढा
​’अग्निवीर’ योजनेच्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अग्निवीर जवानांना ‘इंडियन आर्मी ॲक्ट’ लागू व्हावा आणि युद्धभूमीवर बलिदान देणाऱ्या जवानाला पूर्ण मोबदला व लष्करी सन्मान मिळावा, यासाठी आमची कायदेशीर लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाने या प्रकरणी दुसऱ्या बाजूला नोटीस बजावली असून, यावर लवकरच सुनावणी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

​ध्रुवीकरणाचे राजकारण, इतिहासाची मोडतोड आणि अग्निवीरांचे प्रश्न यांवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या चौफेर फटकेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *