अंबरनाथ शहरातील पाण्याची गळती थांबवण्यावर भर देणार , नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांची माहिती
अंबरनाथ , दि. ४ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरात २७% पाण्याची गळती होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून ही गळती थांबवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी सांगितले. अंबरनाथ शहरासाठी वाढीव दहा एमएलडी पाण्याचे आरक्षण मागितले असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या बदलापूर येथील कार्यालयात अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरातील पाणीपुरवठा संदर्भात सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली. यात अंबरनाथच्या नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले, बदलापूरच्या नगराध्यक्ष सौ. रुचिता राजेंद्र घोरपडे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, बदलापूर भाजपचे गटनेते शरद तेली, सभापती संभाजी शिंदे, किरण भोईर, शैलेश वडनेरे, अंबरनाथ भाजपचे गटनेते अभिजीत करंजुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे, किशोर शेकोकरे, सुरेश खद्री, महेंद्र चांदेकर, सौ. माधवी घरत या अधिकाऱ्यांसह अंबरनाथ बदलापूर मधील लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या दोन्ही शहरांना पुरेल इतका पाणी पुरवठा उपलब्ध आहे. असे असूनही असमान आणि अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. यावर सर्व बाजूने विचार करून पाणीपुरवठा नियमित आणि योग्य दाबाने कसा सुरू होईल याविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
अंबरनाथ शहरात २७% पाणी गळती होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. यावर कारवाई करण्यात येणार आहे. अनेक भागात ४० ते ४५ वर्षांपूर्वी जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यातील अनेक जलवाहिन्या निकामी झाल्या आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा अनेक जलवाहिनी असल्यामुळे नक्की कोणत्या वाहिन्यातून पाणी येत आहे व कोणत्या जलावाहिन्यातून पाणी येत नाही हे कळणे अतिशय कठीण होत चाललेले आहे. विकास कामे करताना, प्रामुख्याने काँक्रीटचे रस्ते करताना आणि रस्ते रुंदीकरण करताना अनेक ठिकाणी जल वाहिन्या रस्त्याखाली दबल्या गेले असल्यामुळे पाण्याची समस्या वाढत असल्याचे या बैठकीत निदर्शनास आल्याचे नगराध्यक्ष सौ. तेजश्री करंजुले यांनी सांगितले. ज्या ज्या भागात जुन्या जलवाहिन्या आहेत त्या जलवाहिन्या बंद करून सर्वत्र नवीन एकच प्रकारच्या जलावाहिन्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. जेणेकरून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात कमी होऊन शहरातील नागरिकांना समान न्यायाने आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. अंबरनाथ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अंबरनाथ शहरासाठी वाढीव दहा एमएलडी पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ.तेजश्री करंजुले यांनी दिली.
अंबरनाथ शहरात बॅरेज धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि अंबरनाथ पालिकेचे चिखलोली धरण या तीन ठिकाणाहून पाणी पुरवठा होत आहे. सध्य परिस्थितीत चिखलोली धरणातून केवळ सहा एम एल डी पाणी शहराला उपलब्ध होत आहे. येत्या काळात या धरणाची उंची वाढवून तसेच या धरणातील गाळ काढून पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी सांगितले.
आमदार किसन कथोरे यांना अंबरनाथ बदलापूर आणि संपूर्ण परिसराची माहिती आहे. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या संपर्काचा अंबरनाथ बदलापूर मधील पाणीपुरवठ्यासहित अन्य महत्त्वाच्या कामासाठी निश्चित लाभ घेण्यात येईल. त्यांचे मार्गदर्शन हे आम्हाला मोलाचे असेल असेही नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी सांगितले. आमदार किसन कथोरे यांचा स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत अधिकाऱ्यांच्या बरोबर घनिष्ठ संबंध आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री महोदय यांच्या बरोबर सुद्धा आमदार किसन कथोरे यांचा चांगला संबंध असल्यामुळे त्याचा लाभ या दोन्ही शहरांच्या विकास कामात निश्चित होईल असा विश्वास सुद्धा नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी व्यक्त केला.
निधीचा योग्य विनियोग
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होत आहे. आलेल्या विकास निधीचा योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे विनियोग होऊन, त्या योजनेचा लाभ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी सांगितले.



