(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर अत्तुज्य पातळीवर पोहोचला आहे. साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन यशस्वी झाले असले तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडल्यामुळे संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांचा नामोल्लेख करून बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सडेतोड टीका केली आहे. त्यामुळे साताऱ्यात पाटलांच्या विश्वासवर बळीराजाचा आसूड ओढल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा व महाराष्ट्रीयन माणसांच्या सुखदुःखाच्या घटनेबाबत भाष्य केले जात होते. त्यामुळे संमेलन अध्यक्ष भाषण याकडे सर्वांचे लक्ष असते. यंदाच्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे भाषण म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्यपालांचे अभिभाषण असते तशा पद्धतीनेच साहित्य अधिवेशनाचे भाषण झाल्याची टीका होऊ लागलेली आहे.
राज्य सरकारने मराठी साहित्य संमेलनासाठी दिलेल्या योगदानाचीच परतफेड या भाषणात दिसून आली आहे. अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सरकारचे गुणगान गाऊन तमाम शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. कोल्हापूरच्या उसाच्या गुराळ त्यातून रस निघाला परंतु गूळ तयार झाला नाही. आतापर्यंतच्या भाषणातील सर्वात लाचार अध्यक्षांचे भाषण अशी टीका शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आज पर्यंत कष्टकरी शोषित लोकांचे आवाज उठवण्याचे काम सर्व अध्यक्षांनी आपल्या भाषणातून केलेले आहे. सध्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शेतकऱ्यांचा व शिक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. परंतु, ज्या ताकतीने प्रश्न मांडायला हवा होता ती ताकद त्यांच्या आवाजात दिसली नाही. विश्वास पाटील सनदी अधिकारी व इतिहास लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी काल त्यांच्या भाषणातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचे गाव कराड तालुक्यात ओंड असताना त्यांनी औंध असे सांगून पंतप्रतिनिधी असताना त्यांनी मालोजीराजे निंबाळकर असे म्हणून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. यावरून त्यांचा इतिहासचा गाढा अभ्यास आम्हाला समजला अशी ह टीका केली आहे .
त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचा त्यांच्या भाषणात सन्मानपूर्वक उल्लेख कधीच केला नाही. चुकून एकदा त्यांच्या भाषणात चव्हाण साहेबांचे नाव आले होते. चव्हाण साहेबांचे साहित्य बद्दलचे प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. याची जाणीव विश्वास पाटलांना नसावी यापूर्वीच्या माजी अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना समोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असताना सुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी सडेतोड शब्दात आवाज उठवलेला होता.
त्यांच्या भाषणाची नोंद संपूर्ण जगातील मराठी लोकांनी घेतलेली होती. त्यांनी कष्टकऱ्यांच्या शोषितांच्या व्यथा मांडून आवाज उठवलेला होता परंतु कालच्या सातारा येथील झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून फक्त सरकारचाच आवाज उठवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. विश्वास पाटील हे एका शेतकरी कुटुंबातून आलेले मराठा घराण्यातील एक सनदी अधिकारी असा लौकिक असलेला अध्यक्ष कडून महाराष्ट्राच्या तमाम जनतेकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामध्ये त्यांना अपयश आलेले आहे.
बिघडलेला गाव सुधारायाचा असेल तर पाटील आणि कुलकर्णी यांची युती व्हावी असे जातीय विधान करून अभिजनांची तळी उचलत बहुजन समजाला कमी लेखण्याचे काम संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध व त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. येणाऱ्या वर्षभरात त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करून बोध घ्यावा आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी लोकांच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते करावे यासाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत . असे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी नमूद केले.




