पुणे, दि.३१। प्रतिनिधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर असणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मोदी आणि पवार आमने-सामने येत असल्याने शरद पवार यांची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारच्या पुणे दौऱ्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी या प्रकरणी पवारांना मोदींसोबत व्यासपीठ शेअर करण्यापूर्वी एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि पवार यांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवरचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत मात्र नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या ७०००० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीत पडलेली उभी फुट ही घटना ताजी असताना शरद पवार या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील बहुचर्चित मणिपूर घटना आणि राज्यात संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या वादग्रस्त विधानांवरून उठलेला गदारोळ, संभाजी भिडे यांच्या अटकेची विरोधकांनी केलेली मागणी याविषयी पुरस्काराच्या व्यासपीठावरून पवार मोदींना काही बोलणार का? याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.