टॉप स्टोरी पालघर

लाल वादळाचा एल्गार

पालघर, दि. २० प्रतिनिधी जल, जमीन आणि जंगल या मूलभूत आणि ज्वलंत प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘लॉन्ग मार्च’ दुसऱ्या दिवशी पालघर येथे पोहोचला. डहाणूतील चारोटी येथून निघालेले हे लाल वादळ आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यात ४० हजारांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले.

सोमवारी सकाळी डहाणूच्या चारोटी येथून या लॉंग मार्चला सुरुवात झाली. तब्बल ४० किलोमीटरचे अंतर कापत हा मोर्चा रात्री पालघरजवळील मनोर येथे पोहोचला. कडाक्याच्या थंडीतही मोर्चाकऱ्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. मनोरमधील शगुन मैदानावर मोर्चाकऱ्यांनी रात्रीचा विसावा घेतला. विशेष म्हणजे, आपली संस्कृती जपत आदिवासी बांधवांनी तारपा नृत्याच्या तालावर रात्र जागवली. तिथेच स्वयंपाक करून सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या मोर्चामध्ये प्रामुख्याने १२ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये वनपट्टे शेतकऱ्यांच्या नावावर करणे, जल-जमीन-जंगलाचे हक्क मिळवणे आणि विशेषतः अदानी समूहाकडून बसवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट मीटर’ला असलेला तीव्र विरोध, या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या महामोर्चामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तसेच याबद्दल प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केले होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने लावलेल्या सूचना फलकावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अछाड येथे प्रशासनाने मराठी आणि हिंदीसोबतच गुजराती भाषेत सूचना फलक लावल्याने स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे.

आमदार कॉ. विनोद निकोले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे व किसान सभेचे नेते कॉ. अजित नवले यांनी या लॉंग मार्चचे नेतृत्व केले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. केंद्र व राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेच्या विरोधात धोरणे राबवत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *