महाराष्ट्रातील ‘सुपर-३०’ साठी जागतिक दारे उघडली! ब्रिस्टॉल विद्यापीठात मोफत शिक्षणाची संधी; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई: आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहणाऱ्या महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. जागतिक कीर्तीच्या ‘ब्रिस्टॉल विद्यापीठा’मध्ये (University of Bristol) शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना खिशातून एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे पार पडलेल्या एका विशेष कराराद्वारे ‘मुख्यमंत्री व ब्रिस्टॉल विद्यापीठ शिष्यवृत्ती’ योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सामंजस्य करारानुसार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मात्र बुद्धीने तल्लख असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाचा १०० टक्के खर्च विद्यापीठ उचलणार आहे. निवड झालेल्या भाग्यवान विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या दिग्गज संस्थेशी जोडले जाणे, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शासन आणि नामांकित शैक्षणिक संस्थांच्या या एकत्र येण्यामुळे आपण अशा पिढीची निर्मिती करू शकू, जी महाराष्ट्राचे नाव जगभरात उज्ज्वल करेल.”
या करारप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. एव्हलिन वेल्च आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या नव्या संधीमुळे आता लंडनच्या विद्यापीठात महाराष्ट्राचे नाव गाजणार असून, गुणवत्तेला गरिबीची आडकाठी राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.




