महासागर स्पेशल एपिसोड:डिजिटल चर्चासत्रात भाजपावर ताशेरे
गुणवंत पाटील, डॉ. उज्वला दहिफळे, तौफिक नदाफ सह संदीप काळे यांचा सहभाग
स्वप्निल दुधारे,मुंबई :- नुकत्याच उमेदवारी मिळण्याच्या कारणावरून महाराष्ट्रभरात गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यातच निष्ठावंतांना डावल्यानंतर हेच कार्यकर्ते तुफान भडकले. पूर्वीच्या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्ते घरची भाकरी बांधून एक विचारधारा घेऊन प्रचाराला उतरायचे. तेंव्हाचा कार्यकर्ता हा एक विचारधारा घेऊन निष्ठेने ज्या पक्षात जन्म झाला त्याच पक्षात मरायचा पण आता ते निष्ठावंत नुकत्याच तिकीट वाटप झाल्यानंतर संपले की काय असा प्रश्न उभा राहिला.
यालाच अनुसरून महासागर डिजिटल च्या माध्यमातून “निष्ठावंता.. तुला शोधू कुठे ? या विशेष चर्चा सत्राचा आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत तथा राजकीय विश्लेषक गुणवंत पाटील हे दिल्लीवरून सहभागी झाले होते तर संभाजीनगर वरून भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ.उज्वला दहिफळे यांचा सहभाग होता. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तथा संशोधक आणि पत्रकार तौफिक नदाफ यांच्यासह दैनिक महासागर चे मुख्य समूह संपादक संदीप काळे यांनीही आपली भूमिका ठामपणे मांडली.
या कार्यक्रमाचे संचालन डिजिटल चे संपादक स्वप्निल दुधारे यांनी केलं.
या चर्चेदरम्यान गुणवंत पाटील यांनी भाजपाची विचारधारा पूर्णतः बदलून गेली असून त्यांना आता विचारधारेची काही लेणं- देणं नाही असा थेट आरोप केला तर उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे जे नाराजी नाट्य आणि जो संताप व्यक्त झाला त्या संदर्भात संदीप काळे यांच्या प्रश्नाला डॉक्टर उज्वला दहिफळे यांनी कार्यकर्त्यांना गृहीत धरून उत्तर दिलं की ” कार्यकर्त्यांची नाराजी दोन ते तीन दिवसापूर्वी असते, आणि भाजपात एवढा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला की तिकीट देताना कार्यकर्ते नाराज झाले, कारण कमी जागेवर देखील हजारोच्या वर कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला होता. उज्वला दहिफळे पुढे बोलताना म्हणाल्या की मलादेखील तिकीट नाकारलं पण मी नाराज नाही, उलट मी देवाचे आभार मानते की मला तिकीट नाकारलं पण मी पक्षाशी एकनिष्ठ आहे.
चर्चासत्रात बोलताना तौफिक नदाफ यांनी थेट भाजपावरती आरोप केला की मुस्लिम समाजाला भाजपा दुर्लक्षित करत आहे. त्याचबरोबर ठाकरे गटातील कार्यकर्ता अनेक कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुथमध्ये जातो आणि भाजपाच्या कोठ्यातून अर्ज करतो यावरून भाजपाची दडपशाही लक्षात येते असा थेट निशा नाही त्यांनी भाजपवर साधला.
तर संदीप काळे यांनी भाजपाची ही रणनीती भाजपालाच भोवणार असा आरोप करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना नुसतं डावलच नाही तर त्यांना अक्षरशः पक्षाने तिकीट न देता त्यांच्या निष्ठेची परीक्षा घेतली. पुढे बोलताना संदीप काळे यांनी “घोडा मैदान दूर नाही” असं सांगत येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात भाजपाला फटका बसेल असा अंदाज ही वर्तवला.



