साल्हेर ते रायगड आणि पॅराग्लायडिंग ते सी-प्लेन; सुट्ट्यांच्या प्लॅनिंगपूर्वी महाराष्ट्राची ही ‘खास’ तयारी पाहिली का?
मुंबई: यंदाची उन्हाळी सुट्टी पर्यटकांसाठी केवळ फिरण्याची नव्हे, तर थराराची पर्वणी ठरणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पर्यटन विभागाला दिलेल्या ताज्या निर्देशानुसार, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक मोठी क्रांती घडण्याची चिन्हे आहेत. एप्रिल महिन्यात आयोजित होणारा ‘डोंगरी महोत्सव’ हा केवळ एक कार्यक्रम न राहता, जागतिक पर्यटकांना आकर्षित करणारे एक भव्य व्यासपीठ ठरणार असून, त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि निसर्गाचे सौंदर्य आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आक्रमक प्रचार-प्रसिद्धी केली जाईल. या नियोजित महोत्सवात पर्यटकांना पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग आणि रॉक क्लायंबिंगसोबतच चक्क ‘सी-प्लेन राईड’चा आनंद घेता येणार आहे. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक साहसी खेळ यांचा असा संगम प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे.
या योजनेचा मुख्य भाग म्हणजे राज्यातील ७५ महत्त्वाच्या स्थळांवर उभारली जाणारी ‘नमो पर्यटन केंद्रे’. पहिल्या टप्प्यात शिवनेरी, रायगड, प्रतापगड आणि साल्हेर या किल्ल्यांवरील सुविधांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ फिरणेच नव्हे, तर ‘आई’ पर्यटन धोरणातून महिला सक्षमीकरण आणि ७,५०० तरुणांना ‘नमो पर्यटन कौशल्य’ प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टही समोर ठेवण्यात आले आहे.
पर्यटन प्रधान सचिव संजय खंदारे आणि एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयामुळे, एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचे डोंगरदऱ्या आणि किल्ले पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. साहसी पर्यटनाची ही नवी लाट महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाच्या शिखरावर नेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




