टॉप स्टोरी महाराष्ट्र

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत शाही आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून जंगी स्वागत

मुंबई | प्रतिनिधी,फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आज एका विशेष शिष्टमंडळासह मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान उतरताच महाराष्ट्र राज्य आणि प्रशासनाच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साहात आणि शाही शिष्टाचारात स्वागत करण्यात आले.

विमानतळावर आयोजित विशेष स्वागत सोहळ्यात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही उपस्थित राहून मॅक्रॉन यांचे स्वागत करत महाराष्ट्राच्या पाहुणचाराची परंपरा जपली.

या महत्त्वाच्या प्रसंगी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अमित कुमार, राजदूत संजीव कुमार सिंगला, अतिरिक्त सचिव (पश्चिम युरोप) पीयूष श्रीवास्तव, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह केंद्र व राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विमानतळावरील औपचारिक स्वागत स्वीकारल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हॉटेल ताज महल पॅलेसकडे रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, भारत आणि फ्रान्समधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *