टॉप स्टोरी महाराष्ट्र

आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत” – उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई, दि. ११ : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने प्रचारही जोरदार ठरला. मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर संयुक्त सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

“आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत. इतक्या पोटतिडकीने बोलल्यानंतर डोक्यात तिडीक गेली पाहिजे. ती जाणार नसेल तर ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. पहिल्या सभेला मीदेखील होतो. आज आमच्या खांद्यावर धनुष्यबाण आहे. ठाकरे बंधू एकत्र का आले हे आज सर्वांना कळाले असेल. भावकी एकत्र आली आहे, आता गावकी एकत्र येतेय. अस्तित्वासाठी ठाकरे एकत्र आले आहेत, असे ते म्हणतात. पण समोर बसलेले ठाकरेच अस्तित्व आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“हिंदू-मुस्लिम न करता केवळ एक भाषण दाखवा, आम्ही सर्व मिळून तुम्हाला १ लाख रुपये देतो,” असे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले. “संयुक्त महाराष्ट्राचे दालन आम्ही उभे करू. त्याची त्यांनी आता दुरावस्था केली आहे. चळवळीत जनसंघ कोठेही नव्हता. या लढ्यात शाहीर अमरशेख हा मराठी माणसाचा सन्मानदेखील होता. ‘२ कौडी के मोल मराठा बिकने को नही’, असे छाती ठोकून दिल्लीकरांना सांगायचं, याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली.”

“भाजपच्या मनातील काळं अण्णाभाऊ बोलून गेले. आम्हाला पालिका का पाहिजे हे आम्ही सांगतोय. पण त्यांना पालिका हवीय कारण त्यांना ती अदानींच्या घशात घालायची आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“९० टक्के मुंबई त्यांनी खोदून ठेवली आहे. आपण जगायचं कसं हे सांगणारी ही मुंबई आहे. संपूर्ण मुंबईत धूळ, सिमेंटचे साम्राज्य आहे. यातील ५०-६० टक्के सिमेंट अदानींच्या कंपनीतील आहे. मराठी माणसाने केवळ घाम गाळून नव्हे तर रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. आम्ही घराणे म्हणून हे आक्रमण परतवत आहोत. मुंबईचा घास गिळता येणार नाही म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. आज ठाकरे आम्ही आहोत पण शरद पवारदेखील आमच्यासोबत आहेत. हे संपले की मराठी माणूस उभा राहू शकणार नाही. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केली नाही. हिसकावण्यासाठी नाही. आमच्याच घरात येऊन आवाज उठवतात, त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय. मराठी माणसाला दुहीचा शाप आहे. मी भाजपच्या ढोंगावर लाथ मारतोय. भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे.”

“संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमचे आजोबा होते. ही आमची घराणेशाही आहे. आमच्या डोळ्यादेखत भाषेचे लचके तोडत असताना, आम्ही प्रबोधनकारांची नातवंडे घरात शेपूट घालून बसणार नाही. मराठीसाठी एकत्र आलो आहोत. आमच्यात वाद नव्हतेच. आम्ही मराठीसाठी एकत्र आलो आहोत.”

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *