क्राइम टॉप स्टोरी नागपूर

नागपुरात शहरात खुनाचे सत्र

नागपूर : नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गुरुवारी (२२ जानेवारी) रात्री काही तासांच्या अंतरात शहरात दोन स्वतंत्र खुनाच्या घटना घडल्या असून, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जुन्या वादातून गिट्टीखदानमध्ये तरुणाची हत्या-
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून एका ३८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हर्ष ऊर्फ गड्डू शिवानंदन पांडे (३८), रा. कामगार नगर, असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष पांडे हा गुरुवारी रात्री आपल्या मित्रासोबत मिलन ऊर्फ बंटी विनायक वानखेडे (३६) याच्यासह बाहेर गेला होता. दोघेही पोलिस लाईन टाकळी येथील पिवळ्या इमारतीजवळ, क्वार्टर क्रमांक ४१६/१५ जवळ उभे असताना पांडेला एक फोन आला. फोनवर बोलण्यासाठी तो थोडा दूर गेला असता, तेथे आधीच्या वादातून बंटी ऊर्फ बुरहान शेख (रा. आवस्थी नगर चौक, पानटपरी चालक) हा आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून तेथे आला.

शेख व त्याच्या साथीदारांनी पांडेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी फरार झाले. गंभीर अवस्थेत पांडेला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृताच्या मित्राच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

अजनी परिसरात पैशाच्या वादातून युवकाचा खून; अल्पवयीन ताब्यात-
दुसऱ्या घटनेत अजनी परिसरात पैशाच्या वादातून एका २८ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.योगेश अनिल काकडे (२८), रा. श्रीकृष्ण नगर, हनुमान मंदिराजवळ, असे मृताचे नाव आहे.

गुरुवारी रात्री सुमारे १०.४५ वाजता, काकडे हा बेसा–मानेवाडा रोडवरील दीपक पान पॅलेसजवळ मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून १७ ते १८ वयोगटातील एक अल्पवयीन तेथे आला. दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. वाद वाढताच अल्पवयीनाने जवळील धारदार चाकू काढून काकडे याच्या कमरेवर, छातीवर व मानेवर सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काकडेला नागरिकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

निवडणुकांनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर-
निवडणुकांनंतर काही तासांतच दोन खुनाच्या घटनांनी नागपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना केल्या जातील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *