टॉप स्टोरी राजकारण

अमोल कोल्हे होणार होते एकत्रित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष! रोहित पवारांचा गौप्यस्फोट; विलीनीकरणाच्या १३ बैठकांचा दावा

मुंबई विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आमदार रोहित पवार यांनी आज एक खळबळजनक दावा केला आहे. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्याचे निश्चित झाले होते, असे रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.

जयंत पाटलांच्या घरी रंगल्या बैठका

रोहित पवार यांनी दावा केला की, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा अत्यंत अंतिम टप्प्यात पोहोचली होती आणि यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः सक्रिय सहभागी होते. दक्षिण मुंबईतील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी या संदर्भात तब्बल १३ बैठका पार पडल्या. ज्या नेत्यांना याबद्दल शंका आहे, त्यांनी खुशाल सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असे थेट आव्हानही त्यांनी अजित पवार गटाला दिले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अमोल कोल्हेंचा सूचक खुलासा

या प्रकरणावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून या विषयाला सुरुवात झाली होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दिवशी आम्ही एकत्र प्रवास केला होता, तेव्हा काही विषयांवर प्राथमिक चर्चा झाली होती. रोहित पवार यांनी जे सांगितले ते आता सार्वजनिक चर्चेत आले आहे,” असे कोल्हे म्हणाले. मात्र, ही चर्चा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती (नाव न घेता सूचित केलेले) आता आपल्यात नसल्याने, ठरलेल्या गोष्टींवर आता अधिक भाष्य करण्यात अर्थ नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

राजकीय समीकरणे बदलणार?

रोहित पवारांच्या या दाव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? आणि जर अमोल कोल्हे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी निश्चित झाले होते, तर प्रक्रियेत आडकाठी कुठे आली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गौप्यस्फोटाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *