टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

अजितदादांच्या शेवटच्या प्रवासात ‘क्रू’ का बदलला? संशयास्पद तथ्यांनी राजकारण पेटले; आता सीबीआयच उकलणार मृत्यूचे गूढ!

विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला धक्का दिला, मात्र आता या प्रकरणाला केवळ ‘दुर्दैवी अपघात’ मानण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे. या घटनेतील काही धक्कादायक आणि संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर, पक्षाच्या वतीने आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा तपास थेट सीबीआय (CBI) कडे सोपवण्याची मागणी करण्यात आली. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी जाऊन या गंभीर प्रकरणावर चर्चा केली.
या निवेदनात राष्ट्रवादीने अत्यंत खळबळजनक मुद्दे उपस्थित केले आहेत. उड्डाण करण्यापूर्वी अगदी शेवटच्या क्षणी विमानातील ‘क्रू’ का बदलण्यात आला, हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या निर्णयामागे कोणाची परवानगी होती आणि हे बदल अचानक का झाले, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसेच, विमान लँडिंगच्या अगदी जवळ असूनही वैमानिकांकडून कोणताही संकटाचा संदेश (Distress Signal) का पाठवला गेला नाही, ही बाब संशयाला अधिक बळकटी देत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी झालेल्या संवादात असलेली विसंगती आणि विमानातील सुरक्षा प्रणालीचे नेमके काय झाले, या सर्व तांत्रिक बाबी केवळ सीबीआयसारखी व्यापक यंत्रणाच उघडू शकते, असे मत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत, तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले आहे. सीआयडी तपास सुरू असला तरी, या घटनेचे गांभीर्य आणि त्यातील आंतरराष्ट्रीय तांत्रिक बाबी लक्षात घेता सीबीआय चौकशीची गरज राष्ट्रवादीने अधोरेखित केली आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळची परिस्थिती आणि विमानाची देखभाल या सर्व बाबी आता फॉरेन्सिक तपासाच्या कक्षेत आणण्याची मागणी जोर धरत आहे.
याच भेटीच्या दरम्यान, महायुतीमधील आगामी रणनीतीवरही चर्चा झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मित्रपक्षांचा सन्मान राखून एकत्रितपणे लढण्यावर एकमत झाले. सुनील तटकरे यांनी यावेळी पक्षांतर्गत नाराजीच्या बातम्यांचेही खंडन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एकसंघ असून, सर्व आमदार आणि पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आता या सखोल तपासाची मागणी दिल्लीत पोहोचल्यानंतर, अजितदादांच्या त्या शेवटच्या प्रवासातील रहस्य कधी उलगडणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *