टॉप स्टोरी महाराष्ट्र

किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांच्या अलोट गर्दीला गालबोट; नियोजनाअभावी चेंगराचेंगरी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

​विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सवासाठी अवघी शिवभूम भगव्या रंगात न्हाऊन निघाली असतानाच, किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली. गडावरील अंबरखाना परिसरातील अरुंद प्रवेशद्वारात शिवभक्तांची प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने हा गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत काही महिला, लहान मुले आणि तरुण जखमी झाले असून, प्रशासनाच्या तोकड्या नियोजनाबद्दल शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​प्रवेशद्वारात कोंडी अन् चेंगराचेंगरी

शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त शिवज्योत घेऊन गडावर दाखल झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा दरम्यानच्या परिसरात शिवभक्तांचा महापूर लोटला. अंबरखान्याकडे जाणाऱ्या अरुंद बोळातून एकाच वेळी शेकडो लोक बाहेर पडण्याचा आणि आत जाण्याचा प्रयत्न करत असताना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीचा दाब वाढल्याने काही शिवभक्त खाली पडले आणि तुडवले गेले. गडावर उपस्थित असलेल्या काही सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलीस बंदोबस्ताचा अभाव?

गडावर ही दुर्घटना घडली तेव्हा तिथे पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. “दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक येतात हे माहीत असूनही अरुंद जागी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा स्वयंसेवक तिथे हजर नव्हता,” अशा शब्दात शिवभक्तांनी प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. पोलीस वेळेवर हजर नसल्याने गर्दीची कोंडी वाढत गेली आणि चेंगराचेंगरी झाली.

​जखमींवर उपचार सुरू

या घटनेत जखमी झालेल्या शिवभक्तांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवली असून गडावरील वाहतूक आणि गर्दीच्या नियोजनात बदल केले आहेत. दरम्यान, या घटनेनंतरही शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह कायम असून ‘जय शिवराय’च्या जयघोषाने गड परिसर दुमदुमून गेला आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *