गुरु माऊली जयंती महोत्सव
श्री ज्ञानेश्वरी भाव कथा:पुष्प सहावे
————–
आकोट दि.१८
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत महाभारताचे अतिशय गौरवपूर्ण आणि अलंकारिक वर्णन केले आहे. “आता अवधारा कथा गहन…” या ओवीतून ते महाभारताच्या अथांगतेचा आणि श्रेष्ठतेचा उलगडा करतात.महाभारतात जगातील श्रेष्ठ विचार आणि कथेचे उगमस्थान आहे.हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे,असे विचार ज्ञानेश्वरी कंठस्थ ह भ प श्री नरहरी महाराज आळंदीकर यांनी व्यक्त केले
गुरुवारी श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०९ व्या जयंती महोत्सवात
श्री ज्ञानेश्वरी भाव कथेचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
आपल्या अमृतवाणीतील चिंतनात ते पुढे म्हणाले सकल धर्माचे सार महाभारतात सामावलेले आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, महाभारत ही केवळ एक गोष्ट नाही, तर ती “सकळ कळांचे जन्मस्थान” आहे. ज्याप्रमाणे समुद्रातून रत्ने निघतात, तसे महाभारतातून जगातील सर्व श्रेष्ठ विचार आणि कथा उगम पावल्या आहेत.
”जे महाभारतात नाही, ते कुठेच नाही” या उक्तीला अनुसरून माऊली स्पष्ट करतात की महाभारताच्या ज्ञानाची खोली सांगता येत नाही.
यात मानवी स्वभावाचे सर्व पैलू, राजकारण, नीती आणि भक्ती यांचा संगम आहे.ही कथा इतकी ‘गहन’ (खोल) आहे की तिची खोली मोजणे सामान्य बुद्धीला शक्य नाही. त्यात संपूर्ण वेदांचा अर्थ या कथेत सोपा करून मांडला आहे.
या कथेला त्यांनी “नवरसांचे सरोवर” म्हटले आहे. यात शृंगार, वीर, करुण, अशा सर्व रसांचा परिपाक आहे, परंतु या सर्वांचे पर्यवसान शेवटी ‘शांत’ रसात आणि भक्तीत होते.
ज्ञानेश्वर माऊलींच्या मते, ही कथा ‘गहन’ असण्याचे मुख्य कारण म्हणजे यात प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण केंद्रस्थानी आहे. ज्या कथेत देव स्वतः सारथी होतो, ती कथा सामान्य असूच शकत नाही.
महाभारत हे केवळ युद्धवर्णन नसून ते आत्मज्ञानाचे भांडार आहे. “अवधारा कथा गहन” असे म्हणून ते श्रोत्यांना सावध करतात की, आता तुम्ही अशा एका महासागरात प्रवेश करत आहात जिथे बुद्धी थक्क होते आणि भक्तीचा उदय होतो.
महाभारत घराघरांमध्ये होते तोवर लोक मरणाला तयार होते परंतु धर्म सोडायला तयार नव्हते. गुरुकुल पद्धतीने मुलांना शिक्षण मिळत होते.
मुलांना संस्काराचे बाळकडू मिळत होते. दुर्दैवाने ही शिक्षण पद्धती बंद करून भारतीयांची मानसिकता गुलाम करून टाकली आहे अशी खंत नरहरी महाराजांनी व्यक्त केली. भारताला विश्वगुरू करायचा असेल तर घराघरात महाभारताचे वाचन म्हणून चिंतन झालं पाहिजे तरच उज्वल भविष्याची दिशा त्यातून मिळू शकते अशा आशयाचे विधान त्यांनी केले.
आज भाव कथेला गावोगावचे मोठ्या संख्येने उपस्थित भाविक श्रोते भक्ती रंगात न्हाऊन गेले होते.
“”””””””””””””””””””””””
शब्दांकन
नंदकिशोर हिंगणकर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




