तिळगुळाच्या गोडीत मतांचं गणित! मकरसंक्रांतीच्या आडून उमेदवारांचा ‘सांस्कृतिक’ प्रचार
दिपक कैतके,विशेष प्रतिनिधी | मुंबई:निवडणुकीच्या आदल्या दिवशी आलेली मकरसंक्रांत उमेदवारांसाठी जणू सुवर्णसंधीच ठरली आहे. सणाचा उत्साह आणि मतदानाचा ताण यांच्या मधल्या अवकाशात उमेदवारांनी प्रचाराची एक नवी, अधिक शिताफीनं आखलेली वाट शोधली असून, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मकरसंक्रांतीच्या वाणाचा प्रभावी वापर सुरू झाला आहे.
थेट भेटवस्तू वाटपाचा धोका टाळत, आता सोसायटी, स्थानिक मंडळे आणि विविध प्रतिष्ठानांच्या माध्यमातून वाण पोहोचवली जात आहेत. वरवर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, पण त्यामागे मतांच्या आकडेमोडीची चाणाक्ष मांडणी—असे हे सगळे चित्र सध्या अनेक भागांत पाहायला मिळत आहे.
तिळगूळ, चिवडा, ओढणी किंवा सणाच्या छोट्या भेटवस्तूंसोबत कुठेही थेट नाव न घेता, पण “आपुलकीचा” सूचक संदेश हळूच दिला जात आहे. उघड प्रचार टाळून मध्यस्थांच्या साखळीमार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही पद्धत आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत राहण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र उभे करते.
निवडणुकीआधी काही भागांत उमेदवार एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप करत असताना, विशेषतः झोपडपट्टी भागांत रात्रीच्या वेळी रोख रक्कम दिल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र आता हा प्रचार केवळ झोपडपट्टीपुरता मर्यादित न राहता, उच्चभ्रू वसाहती आणि गृहनिर्माण संकुलांमध्येही सणाच्या नावाखाली भेटवस्तूंच्या माध्यमातून पोहोचताना दिसतो आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार सहभागी असल्याचे चित्र आहे. थेट कोण दिसत नसले, तरी “वाण कुणाकडून आली” आणि “मत कुणाला अपेक्षित आहे” हे मतदारांपर्यंत सूचक पद्धतीने पोहोचत असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकारांकडे निवडणूक आयोग किती गांभीर्याने पाहतो आणि आवश्यक ती कारवाई कशी करतो, यावरच लोकशाहीवरील विश्वासाची कसोटी लागणार आहे.
मकरसंक्रांतीचा सण संपेल, वाणाची गोडीही ओसरतील; मात्र या गोडीत लपलेल्या राजकीय संदेशांचा निकाल मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
ही संक्रांत सणाची की मतांची—याचे उत्तर मतपेटीत बंद होणार आहे.




