मुंबई, दि. ११ प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला वचननामा (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. खरं तर, शिवसेना-मनसे युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर, महायुतीचा जाहीरनामा कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईसाठीचा आपला वचननामा प्रसिद्ध केला.
महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “१५ तारखेला मुंबई महापालिका निवडणूक पार पडत आहे. आजचा हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. मुंबई हा या देशाचा प्राण आहे, ग्रोथ इंजिन आहे. या मुंबईला पुढच्या पाच वर्षांत जागतिक दर्जाचे शहर करण्याचे वचन आम्ही देत आहोत. केंद्रात आणि राज्यात महायुतीचेच सरकार आहे. आता १६ तारखेला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल.”
“मुंबईच्या विकासासाठी जे करायचे आहे ते आम्ही या वचननाम्यात सांगितले आहे. अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे. मुंबईकर वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत गेलाय, तर दुसरीकडे अंबरनाथ, बदलापूर, वांगणीपर्यंत गेला, याला जबाबदार कोण? असा प्रश्न करत, याचा विचार व्हायला हवा,” असेही शिंदे यावेळी म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले, “झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे लक्ष होते. आता आम्ही हा संपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. हक्काची घरे मुंबईकरांना मिळायला हवीत, यासंदर्भातही वचन आम्ही दिले आहे. सर्वांसाठी घरे ही संकल्पना पुढे नेण्यासाठी ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना घरे मिळतील आणि मुंबईबाहेर गेलेला माणूस पुन्हा मुंबईत येईल.”
“पंतप्रधान, गृहमंत्री आणि माझ्यावर सातत्याने टीका करत आहेत की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, परंतु असे कदापि होणार नाही. पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्त्व दिले आहे. मुंबई फिनटेक सिटी करण्याचा पंतप्रधानांचा निर्धार आहे. यामुळे येणाऱ्या ५ वर्षांत मुंबईला फिनटेक सिटी करायला हवे, अशी आमची भावना आहे. यासाठी केंद्र सरकार आणि मनपा मिळून हे करेल. लाखो तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल.”
“बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष देखील आम्ही महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक लोकाभिमुख उपक्रम राबवून साजरे करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ करण्याचाही आमचा मानस आहे. मुंबईकर लाडक्या बहिणींसाठी बेस्टमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. लघु उद्योजकांना ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणे, पुनर्विकासासाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत, याची खात्री आम्ही दिली आहे. याशिवाय पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देऊ,” अशा अनेक गोष्टी एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितल्या.




