टॉप स्टोरी मनोरंजन

इंडियन आयडल-३ चा विजेता प्रशांत तमंग काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली, दि. ११ वृत्तसंस्था:मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल सीझन ३ चा विजेता प्रशांत तमंग याचे आजरोजी वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रशांतच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जानेवारीच्या पहाटे प्रशांत तमंग याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. प्रशांतच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत, प्रशांतचा आवाज आणि साधेपणाची आठवण करून दिली.

प्रशांत तमंगचा जन्म ४ जानेवारी १९८३ रोजी दार्जिलिंग येथे झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. कुटुंबाचा आधार बनण्यासाठी त्याने कोलकाता पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी स्वीकारली. याच काळात तो पोलीस ऑर्केस्ट्रामध्ये गायन करत होता. २००७ साली प्रशांत तमंगने इंडियन आयडल सीझन ३ साठी ऑडिशन दिले आणि हाच क्षण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आपल्या साध्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि भावस्पर्शी गायनामुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि अखेर विजेतेपद पटकावले. या विजयानंतर त्याने ‘धन्यवाद’ हा संगीत अल्बम प्रदर्शित केला. देश-विदेशात अनेक लाईव्ह शो करत त्याने स्वतःला एक यशस्वी प्लेबॅक व लाईव्ह परफॉर्मर म्हणून सिद्ध केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *